आता एसटीचे स्टेअरिंगही महिलांच्या हाती
By Admin | Updated: March 8, 2015 00:36 IST2015-03-08T00:36:29+5:302015-03-08T00:36:29+5:30
जगात कुठलेही असे क्षेत्र नाही ज्यात महिला नाहीत. सामान्य महिलाही काहीतरी वेगळे करू शकतात परंतु एसटी चालकासारखे वेगळे आव्हानाचे काम करून...

आता एसटीचे स्टेअरिंगही महिलांच्या हाती
महिला दिन विशेष
राजकुमार चुनारकर खडसंगी
जगात कुठलेही असे क्षेत्र नाही ज्यात महिला नाहीत. सामान्य महिलाही काहीतरी वेगळे करू शकतात परंतु एसटी चालकासारखे वेगळे आव्हानाचे काम करून सर्वसामान्य कुटुंबातील महिलाही असामान्य कर्तुत्व गाजवू शकतात, हे येत्या काही दिवसात राज्य परिवहन महामंडळात होणाऱ्या चालक भरतीमधून महिला सिद्ध करून दाखविणार आहे.
सावित्रीच्या लेकी भारतीय संविधामुळे सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहे. आजपर्यंत महिला गावचा कारभार ते राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कल्पना चावलासारख्या महिला अंतराळामध्येसुद्धा पोहचल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सहभागाविना कुठलेच क्षेत्र शिल्लक नाही.
शासनाने शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील शासकीय नोकरीमध्ये महिलांचे स्थान आहे. राज्य परिवहन मंडळामध्ये मेकॅनिक, लिपिक, वाहक या पदावर महिला कार्यरत आहे. मात्र आता राज्य परिवहन महामंडळाने काढलेल्या सात हजार ६३० जागांमध्ये महिलांना ३० टक्के चालकाच्या जागा आरक्षित केल्या आहेत. त्यामुळे २ हजार २१४ महिलासुद्धा एसटीचे चालक म्हणून प्रवाशी वाहतूक करणार आहे.
सर्वसामान्य महिलांनी संसाराचा गाडा ओढण्यासाठी चारचाकी वाहनाचे चाक हाती घेतले आहे. काही महिला मोठ्या शहरात टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. कमी शिकल्यामुळे चांगली नोकरी मिळत नाही. अशा महिलांना धुनी-भांडी किंवा तत्सम हलक्या दर्जाचे कामे करावी लागते. मात्र बारावी झालेल्या महिलांनी चार चाकी वाहनाचा परवाना काढून प्रवाशी वाहन चालविण्याचे आव्हानात्मक कामही करण्याचे ठरविल्याचे आज सर्वत्र चित्र बघावयास मिळत आहे.
मोठ्या शहराबरोबरच ग्रामीण भागातील महिला इतर स्पर्धा परीक्षा किंवा विविध प्रकारच्या आरक्षित जागा जाहिरातीच्या माध्यमातून नोकरीसाठी अर्ज भरतात.
मुंबई -पूणे सारख्या ठिकाणी महिला टॅक्सी चालवितात. त्याच धर्तीवर आता अनेक महिलांनी एसटी चालकसाठी बॅच, बिल्ला व वाहनाचा परवाना काढत आहे. चंद्रपूर शहरातही एक महिला आॅटो चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहे.
चुल आणि मूल यात अडकून न राहता. पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करुन दाखविण्याची जिद्द आता महिलांमध्ये आहे. त्यामुळे एसटीच्या आरक्षणाच्या माध्यमातून अनेक महिला प्रवासी वाहतूक करतांना भविष्यात दिसणार आहेत.