चंद्रपूरकरांच्या शिरावर आता हेल्मेटचा भार
By Admin | Updated: January 18, 2016 00:42 IST2016-01-18T00:42:20+5:302016-01-18T00:42:20+5:30
सध्या पोलिसांचा वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीधारकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.

चंद्रपूरकरांच्या शिरावर आता हेल्मेटचा भार
कारवाईसाठी पोलीस सज्ज : वाहनधारकांची उडणार तारांबळ
चंद्रपूर : सध्या पोलिसांचा वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीधारकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी अगदी काही दिवसांतच केली जाणार आहे.
दुचाकी अपघातामध्ये साधारणत: डोक्याला ईजा होण्याची शक्यता अधिक असते. त्यातून प्रसंगी जीवही गमवावा लागतो. त्यामुळे वाहतूक नियमानुसार पूर्वीपासूनच दुचाकीधारकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. असे असले तरी वाहतूक विभागही या विषयात आतापर्यंत गंभीर नव्हता. मात्र आता प्रत्येक दुचाकीधारकाला हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय वाहतूक पोलीस विभागाने घेतला आहे. लवकरच या विषयात कारवाईची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. परंतु वाहतूक पोलीस विभागाच्या या सक्तीला चंद्रपुरातील वाहनधारक किती जुमानतील, यावरच या मोहिमचे यश अवलंबून आहे.
चंद्रपूर शहरात दुचाकी वाहनांची संख्या हजारोच्या घरात आहे. बोटावर मोडण्याईतके दुचाकीधारक हेल्मेटचा वापर करतात. अन्य दुचाकीधारकांना हेल्मेट सक्तीचे वाटत नाही. त्यामुळे आजवर दुचाकीधारक हेल्मेटचा वापरच करीत नव्हते. परंतु आता वाहतूक पोलिसांकडून थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने प्रत्येकच दुचाकीधारकाला वाहन चालविताना हेल्मेट वापरावे लागणार आहे.
साधारणत: हेल्मेटची किंमत ५०० रुपयांच्या पुढे आहे. चांगल्या कंपनीचे हेल्मेट दिड हजारांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. आता हेल्मेट सक्तीचे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अधिकचा आर्थिक भूर्दंड यानिमित्ताने सहन करावा लागणार आहे. हेल्मेट खरेदीसाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
हेल्मेट उपलब्ध होतील काय?
येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी वाहनधारकांविरुद्ध कारवाईची मोहिम आरंभली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी दुचाकीधारकांना हेल्मेट खरेदीच करावे लागणार आहे. चंद्रपूर शहरातील वाहनांची संख्या लक्षात घेता, एकाचवेळी विक्रेत्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात हेल्मेट उपलब्ध होतील काय, हा खरा प्रश्न आहे.
दुचाकी अपघातामध्ये दुचाकीवरील प्रवाशाच्या डोक्याला गंभीर ईजा होते. त्यातून अनेकदा मृत्युही ओढवतो. त्यामुळे नागरिकांच्याच सुरक्षेसाठी आम्ही प्रत्येक दुचाकीधारकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करणार आहोत. त्यामुळे दुचाकीधारकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा. मोहिमेदरम्यान, जर कुणी दुचाकीधारक हेल्मेटशिवाय वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल.
- अशोक कोळी,
पोलीस निरीक्षक
वाहतूक विभाग चंद्रपूर.