आता औषधांच्या चिठ्ठीवर शौचालयाची नोंद
By Admin | Updated: February 8, 2015 23:33 IST2015-02-08T23:33:04+5:302015-02-08T23:33:04+5:30
स्वच्छता मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. आता आरोग्य यंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. यात जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,

आता औषधांच्या चिठ्ठीवर शौचालयाची नोंद
माजरी: स्वच्छता मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. आता आरोग्य यंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. यात जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, कुटीर, वैद्यकीय केंद, संस्था, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, यासोबत नोंदणीकृत खासगी रुग्णालय, वैद्यकीय व्यावसायिक आणि निमशासकीय संस्था, कंपनीच्या रुग्णालयांना या मोहिमेत सहभागी करण्यात येणार आहे. त्यानुसार डॉक्टरांना आता औषधांचा चिठ्ठीवर रुग्णांच्या घरी किंवा कार्यालयात शौचालय आहे किंवा नाही, याबाबतची नोंद करावी लागणार आहे.
प्रत्येक घरी शौचालय बांधण्यासाठी रुग्णांना प्रवृत्त करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २१९ पर्यंत संपूर्ण देश निर्मल करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. शौचालय नसल्यामुळे लोक उघड्यावर शौचास बसत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, पाणी व हवा दुषित होऊन अतिसार, कॉलरा, विषमज्वर, हगवण, कावीळ, कुपोषण, पोलीओ आणि रोटाव्हायरससारखे आजार होत आहेत.
सरकारी, निमसरकारी, खासगी रुग्णालयांच्या मार्फत आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. आता तर वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही शौचालयाबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली असून आता रुग्णांना तपासल्यानंतर दिल्या जाणाऱ्या औषधांच्या चिठ्ठीवर शौचालय आहे किंवा नाही याबाबतची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ज्यांच्या घरी वैयक्तिक शौचालय नसल्यास अशा लोकांना समुपदेशन करुन शौचालय बांधण्यास प्रवृत्त करावे. रुग्णास शौचालयाचे होणारे फायदे व शौचालय नसल्याने होणारे नुकसान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात स्वच्छतेचा जागर होत आहे. खासगी असो की सरकारी कर्मचारी प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व पटले आहे. मात्र ग्रामीण, दुर्गम, आदिवासी, झोपडपट्टी यासह इतरही अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने येथील घटकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. शासकीय आरोग्य विभाग आणि खासगी यंत्रणांच्या माध्यमातून प्रबोधनाद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्याचा व जनजागृतीचा प्रयत्नही सुरू आहे. (वार्ताहर)