आता रेशीम शेतीला रोहयोची साथ
By Admin | Updated: November 9, 2014 22:31 IST2014-11-09T22:31:28+5:302014-11-09T22:31:28+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील भोई (ढिवर) समाज करीत असलेल्या रेशीम शेतीला (उद्योगाला) शासनाने आता रोहयोशी जोडल्याने सदर समाजाला बारमाही रोजगार उपलब्ध होणार असून त्यांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.

आता रेशीम शेतीला रोहयोची साथ
पेंढरी : चंद्रपूर जिल्ह्यातील भोई (ढिवर) समाज करीत असलेल्या रेशीम शेतीला (उद्योगाला) शासनाने आता रोहयोशी जोडल्याने सदर समाजाला बारमाही रोजगार उपलब्ध होणार असून त्यांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.
रेशीम लागवडीचे काम आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ढिवर (भोई) समाज बांधवांना वर्षभर काम मिळण्याबरोबरच रेशीम लागवड शेतकऱ्यालाही मजुरी मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी येथे रेशीम कोसा उद्योग केंद्र असून या केंद्रातंर्गत पाथरी, गुंजेवाही, गांगलवाडी, मेंडकी पेंढरी (कोकेवाडा), मोठेगाव, सिरपूर, काजळसर, इत्यादी ठिकाणचे भोई बांधव रेशीमची लागवड करतात. परंतु त्यांच्या कोशाला साजेसा भाव मिळत नसल्याने व तसेच त्यांना भरपूर प्रमाणात वीज पुरवठा होत नसल्याने व घरची सर्व मंडळी या शेतीत व्यस्त असल्याने ही रेशीम शेती याअगोदर परवडणारी नव्हती. परंतु आता राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार रेशीम उत्पादन हा शेतीशी निगडीत व्यवसाय असल्याने याला रोजगार हमी योजनेचे बळ मिळणार आहे. या अगोदर रेशीम उत्पादनाची कामे रोहयोच्या माध्यमातून करण्यास शासनाची परवानगी नव्हती. या उद्योगाद्वारे रेशीम किडे सोडणे, त्याचे संगोपन करणे, झाडाची छाटणी करणे, रेशीम किडे गोळा करणे आदी कामे केली जातात.
या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांसाठी एक लाख ९६ हजाराचे अंदाजपत्रक तयार करावे लागणार असून त्यामध्ये नऊ हजार रुपये लाभार्थ्यांचा भत्ता राहणार आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया अजूनपर्यंत सुरु झाली नसल्याचे कळते. परंतु या बारमाही रोजगारामुळे भोई समाज बांधवात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)