आता अमृत आहार योजनेतील अंगणवाडी सेविका व सचिवांचे संयुक्त खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST2021-01-10T04:21:21+5:302021-01-10T04:21:21+5:30
चिमूर : सप्टेंबर २०२० ला मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित होताच पदाधिकारी व समित्या बरखास्त झाल्या. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना ...

आता अमृत आहार योजनेतील अंगणवाडी सेविका व सचिवांचे संयुक्त खाते
चिमूर :
सप्टेंबर २०२० ला मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित होताच पदाधिकारी व समित्या बरखास्त झाल्या. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना चालवताना आर्थिक ओढाताण करावी लागत आहे. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा १ जानेवारीपासून अमृत आहार योजनेचा पुरवठा बंद करणार, अशा आशयाची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत जि. प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी चार सदस्यीय आहार समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबतची सभा घेऊन अमृत आहार योजनाच्या बॅंक खात्यामधून रक्कम काढण्याकरिता संबंधित ग्रामपंचायतचे प्रशासक व सचिव म्हणून अंगणवाडी सेविका यांचे संयुक्त खाते असा बदल केला आहे.
यामुळे अमृत आहार योजना चालवताना अंगणवाडी सेविकांची आर्थिक ओढाताण थांबली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील १५ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पांमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू आहे. आदिवासी विभागामार्फत २०१६ मध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना अंगणवाडी केंद्रात सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत स्तनदा माता, गरोदर माता, कुपोषित बालके यांना पोषण आहार पुरविला जातो. योजनाचे आर्थिक व्यवहार समितीचे अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संयुक्त स्वाक्षरीने होत होते. बऱ्याच ग्रामपंचायतींचा कार्यकाळ सप्टेंबर २०२० ला संपला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. याच काळात ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्यामुळे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अमृत आहार योजना चालवताना अंगणवाडी सेविकांच्या नाकीनऊ आले. संयुक्त समितीच्या खात्यात रक्कम असताना काढता येत नव्हती. आर्थिक ओढाताण करून अंगणवाडी सेविका अमृत आहार योजना चालवित होत्या.
या संदर्भात अंगणवाडी कर्मचारी सभाचे जिल्हाध्यक्ष इमरान कुरेशी यांनी अंगणवाडी सेविकांची आर्थिक ओढाताण पाहता जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांना अमृत आहार योजनाच्या संयुक्त खात्याविषयी पर्यायी व्यवस्था करा, अन्यथा १ जानेवारीपासून अमृत आहार योजनाचा पुरवठा बंद करण्याचा इशारा निवेदनातून दिला होता. ‘लोकमत’नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले. या बातमीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ दखल घेत ३१ डिसेंबरला मीटिंग लावून भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना अविरत चालू ठेवण्यासाठी अमृत आहार योजनेच्या आहार समितीच्या बँक खात्यातून रक्कम काढण्याकरिता महिला सरपंच, महिला सदस्य यांच्याऐवजी ग्रामपंचायतचे प्रशासक, सदस्य सचिव म्हणून अंगणवाडी सेविका यांचे संयुक्त खाते असा बदल करण्यात आला.