आता मोबाईलवर मिळवा वीज बिलाची माहिती
By Admin | Updated: August 18, 2016 00:37 IST2016-08-18T00:37:39+5:302016-08-18T00:37:39+5:30
ग्राहकांसोबत सुसंवाद वाढविण्याच्या दृष्टीने महावितरणने मोबाईल अॅप सुरू केले आहेत.

आता मोबाईलवर मिळवा वीज बिलाची माहिती
महावितरण : मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन
चंद्रपूर : ग्राहकांसोबत सुसंवाद वाढविण्याच्या दृष्टीने महावितरणने मोबाईल अॅप सुरू केले आहेत. यातील ‘महावितरण कर्मचारी मित्र अॅप’च्या माध्यमातून आता ग्राहकांना खंडित वीजपुरवठा, वीजबिल यासह अन्य माहिती तातडीने मिळणार आहे. ही माहिती महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांस त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. ग्राहकांनी ही नोंदणी त्वरित करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
आपल्या भागातील रोहित्रात बिघाड झाला असेल किंवा दुरुस्ती कामासाठी वीजपुरवठा खंडित करावयाचा असल्यास त्याबाबत माहिती एसएमएसने महावितरणद्वारे देण्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या टोन फ्री क्रमांकावर १८००२३३३४३५, १८००२००३४३५ किंवा १९१२ वर फोन करून नोंदणी करावी लागेल. एसएमएस पाठविल्यावर एमआयडी-एमएसईडी आपले रजिस्ट्रेशन झाल्याबाबत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी झाल्याचा एसएमएस प्राप्त होईल. हा एसएमएस काहीवेळा उशिरा प्राप्त होत शकतो. परंतु आपले रजिस्ट्रेशन हे झाले असेल. मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात शेतकरीही मागे नाहीत. चंद्रपूर मंडळातील एक हजार ४४६ शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक, तर २९ शेतकऱ्यांनी ईमेल-आयडीची नोंदणी केली आहे. मोबाईल अॅपद्वारे वीज बिल देणे, रिडिंग घेणे अशा सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)
५९ हजार ७४७ ग्राहकांची नोंदणी
चंद्रपूर परिमंडळांतील ५९ हजार ७४७ ग्राहकांनी मोबोईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. त्यात चंद्रपूर मंडळातील ४७ हजार ५२२ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. यात ३९ हजार ८९३ घरगुती, पाच हजार ४९ वाणिज्यिक, तर ७८३ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. ई-मेल-आयडीची नोंदणी ३५२९ घरगुती ग्राहकांनी, २९९ वाणिज्यिक व ९४ औद्योगिक ग्राहकांनी केली आहे. या ग्राहकांना ई-मेलद्वाराही वीजबिल मिळणार आहे.