Now the future soldiers of the country will live on the horizon of tigers | आता वाघांच्या भिवकुंडावर राहणार देशाचे भावी सैनिक
आता वाघांच्या भिवकुंडावर राहणार देशाचे भावी सैनिक

ठळक मुद्दे२० जूनला प्रशिक्षण प्रारंभ : सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने संरक्षण क्षेत्रात चंद्रपूर देशाच्या नकाशावर

वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील घनदाट जंगलातील भिवकुंड नाला परिसर सुमारे ५० वर्षापूर्वी वाघांच्या वास्तव्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. आता त्याच भिवकुंडावर देशाचे सच्चे वाघ म्हणजेच सैनिक वास्तव्यास राहणार आहेत. ते तेथे संरक्षण विषयक शिक्षण घेऊन देशाच्या रक्षणाकरिता, सुसज्ज होऊन बाहेर निघणार आहेत. देशातील अशी ही सर्वोतम सैनिक शाळा भिवकुंड येथे तयार झाली असून २० जूनपासून तेथे सैनिकी शिक्षण दिले जाणार आहे. प्रवेशाची प्रक्रिया १७ जूनपासून सुरू होत आहे.
राज्यातील पहिली एकमेव सैनिक शाळा सातारा येथे आहे. भिवकुंड येथील त्या प्रकारची राज्यातील दुसरी शाळा आहे. १२३ एकर क्षेत्रात ३५० कोटी खर्चूनही शाळा बांधली आहेत. यात थल, जल आणि वायू प्रकारचे शिक्षण दिले जाणार असून त्या प्रकारची आधुनिक सामुग्री येथे असणार आहे. तदवतच, संरक्षण दलाचे अधिकारी शिक्षण देणार आहेत.
राज्याचे अर्थ, वन आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने ही शाळा येथे बांधण्यात आली असून या सुसज्ज सैनिक शाळेमुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव संरक्षण खात्यात देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटणार आहे. जिल्ह्यातील भांदक येथे आयुध निर्माण आणि आता सैनिक शाळा देशाच्या संरक्षण क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्याचे हे भरीव योगदान आहे.

संरक्षण भिंती किल्ल्याच्या तटासारख्या
या शाळेच्या संरक्षक भिंती किल्ल्याच्या तटाप्रमाणे बांधल्या असून प्रवेशव्दार भव्य आणि देखणे आहे. आता प्रवेश केल्यानंतर आतील विस्तीर्णता व एकूण साजसामुग्री डोळे दिपवणारी आहे. या शाळेची विद्यार्थी क्षमता ४५० एवढी आहे. २५ विद्यार्थ्यांना एक शिक्षक असे प्रमाण राहणार आहे. शिक्षण मराठी व इंग्रजी भाषेतून दिले जाईल. खेळण्याकरिता मोठे मैदान तसेच एक हजार लोक सामावू शकतील एवढे मोठे प्रेक्षकगृह तेथे बांधण्यात आले आहे. घुडसवारीकरिता घोडेही असणार आहे. अद्यायवत सैनिक संग्रहालय, शहीद झालेल्या सैनिकांच्या मूर्ती इत्यादी प्रेरणादायी वस्तु असतील. माहिती पट दाखविण्याची व्यवस्था इत्यादी सैनिकी शाळांकरिता आवश्यक सारे तेथे असणार आहे.

२० जूनपासून शिक्षणाला प्रारंभ
या सैनिकी शाळेचे बरेचसे काम झाले आहे व बाकीचे लवकरच होईल. प्रशिक्षण सुरू करण्याएवढे काम झाले असून २० जूनपासून शिक्षण देणे सुरू होणार आहे. त्याकरिता राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाणार आहे. आर्थिक स्थितीनुसार, त्या कक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय या शाळेत असणार आहे. प्रारंभी मात्र फक्त विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश दिला जाईल. या सैनिकी शाळेला येथे उघडण्याकरतिा ना. मुनगंटीवार यांना खूप प्रयत्न करावा लागला. ही सैनिक शाळा त्यांच्या जिद्दीचे फळ होय. या सैनिकी शाळेमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या वैभवात भर भरणार आहे. हे वेगळे सांगायलाच नको !


Web Title: Now the future soldiers of the country will live on the horizon of tigers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.