महापालिकेला धूर फवारणीचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:38 IST2016-08-06T00:38:16+5:302016-08-06T00:38:16+5:30
पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या, गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

महापालिकेला धूर फवारणीचा विसर
रुग्ण सख्या वाढली : डासांच्या प्रादुर्भावाने चंद्रपूरकर वैतागले
चंद्रपूर : पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या, गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सहाजिकच ही जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाला पेलायची असते. मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी मनपा प्रशासनाला एकदोन वॉर्डाचा अपवाद सोडला तर धूर फवारणीचा मुहुर्तच सापडलेला दिसत नाही. मनपाच्या या हलगर्जीपणामुळे चंद्रपुरातील प्रत्येक वॉर्डात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. परिणाम मलेरिया, व्हायरल फिवरचा प्रकोप वाढला आहे.
नाल्या, गटारे चोकअप होऊन पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ नये, साथीचे आजार बळाऊ नये, यासाठी उन्हाळ्याच्या अखेर शहरातील नाल्या, गटारांचा उपसा करून स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. यावर्षी मनपाने नाल्या, गटारांची सफाई केली. मात्र ही सफाई थातूरमातूर होती. चंद्रपूर शहरातून मोठे नाले वाहतात. या नाल्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे या नाल्यांचा उपसा होऊ शकत नाही. जोरदार पाऊस झाला की नाल्यातील घाण रस्त्यावर येते. असा अनुभव यावर्षीही येत आहे. परिणामी मनपाची नाले सफाई यंदाही फार्स ठरली आहे.
यासोबतच पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी जमा होत असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी विविध प्रकारच्या औषधांची फवारणी, धूर फवारणी करणे गरजेचे असते. नागरी आरोग्य अबाधित रहावे, यासाठी महानगरपालिकेने नियमितपणे ही कामे करावयाची असतात. मात्र या कामाचा सध्या मनपालाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूरचा वाढता विस्तार बघता मनपा प्रशासनाची कामे सुरळीत पार पडण्याकरिता मनपाने झोननिहाय विभागणी केली आहे. तीन झोन कार्यालयातून हा कारभार चालविला जातो. महानगरपालिकेच्या कार्यालयात जेवढे विभाग आहेत, ते सर्व विभाग या झोन कार्यालयात कार्यान्वित झाले आहे. विविध औषधांची फवारणी आणि धूर फवारणीही याच झोन कार्यालयाच्या माध्यमातून केली जाते. वॉर्डनिहाय धूर फवारणी करण्याचे वेळापत्रकच महानगरपालिकेत तयार असते. असे असले तरी धूर फवारणीचा मुहुर्त मात्र अद्याप मनपाला सापडला नसल्याचे दिसून येत आहे.
औषधांची फवारणी आणि फागींग मशीनद्वारे केली जाणारी धूर फवारणी होत नसल्यामुळे अनेक वॉर्डात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. डासांमुळे चंद्रपूरकरांची झोपच उडाली आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजाराने डोके वर काढणे सुरू केले आहे. चंद्रपूर शहरात मागील काही दिवसात तापाच्या रुग्णात दुपटीने वाढ झाली आहे. अनेक रुग्ण मलेरियाने बाधित होऊन खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. डासांच्या प्रकोपामुळे चंद्रपूरकर वैतागले असतानाही मनपाला मात्र त्याचे काही देणे घेणे असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)
डासांचा नायनाट करण्यासाठी इतर साधनांपेक्षा फॉगींग मशीनने केलेली धूर फवारणी उपयुक्त ठरते. त्यामुळे प्रत्येक शहरात ही फवारणी नियमितपणे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. महानगरपालिकेत एक चारचाकी वाहनांवर असलेली मोठी फॉगींग मशीन व तीनही झोन कार्यालयात प्रत्येक तीन फॉगींग मशीन्स उपलब्ध असल्याची माहिती आहे. झोन कार्यालयाशी संलग्न असलेल्या प्रत्येक वॉर्डात आठ किंवा पंधरा दिवसाआड फॉगींग मशीनद्वारे धूर फवारणी करणे आवश्यक आहे. मात्र काही वॉर्डाचा अपवाद सोडला तर चंद्रपुरातील बहुतांश वॉर्डात अद्यापही धूर फवारणी झाली नाही.
नगरसेवकांनी गांभीर्याने
लक्ष द्यावे
शहरात नियमितपणे फॉगींग मशीनद्वारे धूर फवारणी करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मात्र यात मनपा प्रशासन हलगर्जीपणा करीत असल्याने आता प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी आपल्या प्रभागात धूर फवारणी करण्यासाठी मनपा प्रशासनाला बाध्य करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.