कुख्यात हाजीला चंद्रपूर कारागृहाने नाकारले
By Admin | Updated: May 11, 2015 01:05 IST2015-05-11T01:05:49+5:302015-05-11T01:05:49+5:30
विविध गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड हाजी सरवर याला शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली;

कुख्यात हाजीला चंद्रपूर कारागृहाने नाकारले
रूपेश कोकावार चंद्रपूर (बाबूपेठ)
विविध गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड हाजी सरवर याला शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली; मात्र चंद्रपूर येथील कारागृह प्रशासनाने त्याला ठेवण्यास चक्क नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी रविवारी १० वाजता चोख बंदोबस्तात हाजीला नागपूर येथील कारागृहात हलविले
कारागृह प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पोलिसांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. हाजी सरवरच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी लक्षात घेता, त्याला नागपूरला नेत असताना काही विपरीत घडले असते तर, त्याची जबाबदारी कुणी स्वीकारली असती, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मंगळवारी ५ मे रोजी हाजीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला २२ मेपर्यंत चंद्रपूरच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बजावले. हा आदेश मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर टिक्कस व त्यांच्या पथकातील सदस्य हाजी सरवरला चंद्रपूरच्या कारागृहात घेऊन गेले. मात्र नागपूरच्या कारागृहातून काही खतरनाक गुंड पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणावरून चंद्रपूर कारागृहाचे अधीक्षक ए.के. जाधव यांनी हाजीला कारागृहात ठेवण्यास थेट नकार दिला. यावेळी पोलिसांनी जाधव यांना एका रात्रीपुरते तरी हाजीला येथे ठेवा, अशी विनवणी केली. मात्र जाधव यांनी पोलिसांचे काहीएक ऐकले नाही. अखेर नाईलाज झाल्याने पोलिसांना त्याच रात्री हाजीला बंदोबस्तात नागपूर येथील कारागृहात घेऊन जावे लागले. पोलीस गुंडाला अटक करतात. परंतु कारागृह प्रशासन कोणतीही मदत करीत नसल्याने पोलीस यंत्रणेतही नाराजी व्यक्त केली जात आहे.
खतरनाक गुंड कारागृहात
चंद्रपूरच्या कारागृहात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे असलेल्या खतरनाक गुंडांना ठेवण्यात आले आहे. सध्याही येथे काही गुन्हेगार असल्याची माहिती आहे. काही नक्षलवादीही या कारागृहात ठेवण्यात आल्याचा इतिहास आहे. असे असताना हाजीला या कारागृहात न ठेवण्यामागचा उद्देश काय, असा प्रश्न आहे.
हा तर जबाबदारी झटकण्याचा प्रकार
गुंड हादेखील शेवटी माणूसच असतो. कारागृहात दाखल झाल्यानंतर दक्ष राहून गुन्हेगाराच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवणे, ही कारागृहाची जबाबदारी असते. मात्र अलिकडील काळात कारागृहातही बोकाळलेल्या गैरप्रकारामुळे गुंड कारागृह प्रशासनावर वरचढ होत आहेत, असेच कारागृह अधीक्षकांना सुचवायचे होते काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.