विना अनुदानित शाळा आरोग्य तपासणीतूनही बाहेर
By Admin | Updated: August 2, 2015 01:03 IST2015-08-02T01:03:55+5:302015-08-02T01:03:55+5:30
शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके, गणवेश, शिक्षक अनुदान प्रोत्साहन भत्ता, प्रशिक्षण यापाठोपाठ आता आरोग्य विभागातर्फे दरवर्षी ...

विना अनुदानित शाळा आरोग्य तपासणीतूनही बाहेर
पालकांमध्ये नाराजी : विद्यार्थी आरोग्य सेवेपासून वंचित
राजकुमार चुनारकर खडसंगी
शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके, गणवेश, शिक्षक अनुदान प्रोत्साहन भत्ता, प्रशिक्षण यापाठोपाठ आता आरोग्य विभागातर्फे दरवर्षी होणारी मोफत आरोग्य तपासणीही यावर्षी विनाअनुदानित शाळांमध्ये होणार नसल्याने या शाळामधील सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीपासून वंचित राहावे लागणार आहे. शासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा संघटित संस्था चालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली असून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व सर्वशिक्षा मोहिमेतंर्गत ग्रामीण भागातील पहिली ते दहावी आणि शहरी भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यामधील गंभीर आजारावर मोफत उपचार करण्यासाठी शालेय तपासणी मोहीम सन २००८-०९ पासून राज्यभर सुरू आहे. आतापर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेतून विद्यार्थ्यामधील मानसिक आजार, मेंदुविकार, रक्तक्षय, रक्ताभिसरण, हृदयरोग, कर्करोग, नेत्ररोग, कर्णरोग, पचनक्रीया, दंतक्षय आदी गंभीर आजाराचे निदान झाले होते. अनुदानित, विनाअनुदानित अशा दोन्ही शाळामधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी या मोहिमेअंतर्गत मोफत केली जात होती.
मात्र यावर्षापासून विनाअनुदानित शाळा मोफत आरोग्य तपासणीपासून वगळण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शासन विनाअनुदानित शाळांना शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, शिक्षक अनुदान, प्रोत्साहन भत्ता, प्रशिक्षण यापासून दूर ठेवत आहे.
आता विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीलाही ‘खो’ दिला जात आहे. राज्यात हजारो प्राथमिक आणि दोन हजार ८५ माध्यमिक शाळा विनाअनुदानित तत्वावर सन २००१ पासून सुरू आहेत.
पंधरा वर्षापासून विनाअनुदानित शाळांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात नाही. मात्र विनाअनुदानित शाळामधील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षापासून आरोग्य तपासणीपासूनही वंचित ठेवले जात असल्याने पालकामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.