कमी उंचीमुळे सिग्नल दिसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:42+5:302021-04-25T04:28:42+5:30
दाताळा मार्गावर अपघाताची शक्यता चंद्रपूर : येथील दाताळा मार्गावरील इरई नदीवर नव्याने पूल बांधण्यात आला आहे. मात्र, येथे अनेकजण ...

कमी उंचीमुळे सिग्नल दिसेना
दाताळा मार्गावर अपघाताची शक्यता
चंद्रपूर : येथील दाताळा मार्गावरील इरई नदीवर नव्याने पूल बांधण्यात आला आहे. मात्र, येथे अनेकजण रस्त्यावरच सेल्फी काढतात, तर काही जण पुलाच्या मध्येच आपले वाहन पार्क करीत आहेत. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळच्या वेळेस येथे गर्दी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील माती उचलावी
चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यांवर रेती तसेच माती साचली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे आता रस्त्यावर रहदारी नाही. त्यामुळे माती तसेच रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. काही नागरिक घराचे बांधकाम करण्यासाठी अगदी रस्त्यावरच बांधकाम साहित्य ठेवत आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
चंद्रपूर शहरात वाहतुकीचा खोळंबा
चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यांवर, मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
झोपडपट्टींचे निर्मूलन करावे
चंद्रपूर : दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे वाट्टेल तिथे घर बांधून नागरिक राहतात. विशेषत: झोपडपट्टीचा परिसरही वाढत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना किमान सुविधा उपलब्ध करून देत शहरातील झोपडपट्टी निर्मूलन करावे, अशी मागणी केली जात आहे.
परवानगी देण्यासाठी टाळाटाळ
चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध पावले उचलली जात आहे. कार्यक्रमांवरही बंदी आली असून परवानगी घ्यावी लागत आहे. मात्र, काही ग्रामपंचायती तसेच नगर परिषदेतील काही कर्मचारी परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. परिणामी, कार्यक्रम घेणाऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.
प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे
चंद्रपूर : जिल्हा जातपडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे चंद्रपूरसह अन्य तीन जिल्ह्यांचा प्रभार देण्यात आला आहे. यासह संशोधन अधिकाऱ्यांकडेसुद्धा चंद्रपूर व गडचिरोली समाजकल्याण विभागांचा प्रभार आहे. त्यामुळे अनेक प्रकरणी प्रलंबित आहे. परिणामी, नागरिकांनी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.
एटीएममध्ये सुरक्षारक्षक नाही
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात आल्या. मात्र, मागील काही दिवसांपासून पैशांचा ठणठणाट आहे. त्यातच, सुरक्षारक्षकही नसल्यामुळे एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी
चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यामुळे अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नेटवर्कअभावी ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांमध्ये विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. त्यातच ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.
बेरोजगार पुन्हा नैराश्यात
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नसल्याने ते नैराश्यात होते. मात्र, आता लॉकडाऊनने अनेक उद्योगधंदे बंद पडले. भरतीसुद्धा बंद आहे. त्यामुळे बेरोजगार पुन्हा नैराश्यात जात आहेत.
फळांची मागणी वाढली
चंद्रपूर : रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त फळे खायला नागरिक पसंती देत आहेत. त्यातच आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने विविध फळे निघाली आहेत. मात्र, जनता कर्फ्यूमुळे सध्या बाजारपेठेत फळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
मनपाच्या दुर्लक्षाने अतिक्रमण वाढले
चंद्रपूर : शहरातील गांधी मार्ग तसेच कस्तुरबा मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील सिस्टर कॉलनी परिसरात एक दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासते. कोरोनाच्या दहशतीत पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
परवानगी देण्यासाठी टाळाटाळ
चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध पावले उचलली जात आहे. कार्यक्रमांवरही बंदी आली असून परवानगी घ्यावी लागत आहे. मात्र, काही ग्रामपंचायती तसेच नगर परिषदेतील काही कर्मचारी परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. परिणामी, कार्यक्रम घेणाऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.
मजुरांना आर्थिक अडचण
चंद्रपूर : जिल्ह्यातील जनता कर्फ्यू असल्याने सर्वच कामे बंद आहेत. त्यामुळे मजुरांची मोठी अडचण होत आहे. मागील वर्षी मदत मिळत होती. मात्र, आता मदतही मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांची जेवणाची व्यवस्था करावी
चंद्रपूर : कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक कोविड रुग्णालयासमोर ताटकळत राहतात. आरोग्य विभागाकडून रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येते. मात्र, नातेवाइकांना जेवणाची सोय नसल्याने त्यांना उपाशी राहावे लागते. त्यामुळे शासनाने रुग्णांच्या नातेवाइकांची जेवणाची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.