गोंडपिंपरीत ‘नो पार्किंग झोन’ खासगी वाहनांच्या ताब्यात
By Admin | Updated: February 23, 2015 01:15 IST2015-02-23T01:15:00+5:302015-02-23T01:15:00+5:30
येथील नवीन बसस्थानकावर फलाट नियोजित जागेच्या बाजूला ‘नो पार्किंग झोन’ असे लिहून असतानाही मोठ्या प्रमाणात वाहने उभी केल्या जातात.

गोंडपिंपरीत ‘नो पार्किंग झोन’ खासगी वाहनांच्या ताब्यात
गोंडपिपरी : येथील नवीन बसस्थानकावर फलाट नियोजित जागेच्या बाजूला ‘नो पार्किंग झोन’ असे लिहून असतानाही मोठ्या प्रमाणात वाहने उभी केल्या जातात. त्यामुळे बसस्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
येथील बसस्थानक परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अहेरी-चंद्रपूर-नागपूर असा दीर्घ प्रवास करणाऱ्या बसगाड्यांचा येथे पाच ते दहा मिनीटांचा थांबा आहे. त्यामुळे कधी-कधी सर्व फलाट बसगाड्यांनी व्यापलेले असतात. असा प्रसंग आल्यास एखादी बस थांबण्यास जागाच उरत नाही. अशातच दुचाकीस्वार येथेच वाहन उभी करत असतात. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून पार्किंग झोन नसतानाही वाहने उभी केली जात आहे. याचा त्रास बसगाडीत चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांसह इतर बसचालकांनाही सहन करावा लागत आहे. काही तरुण मंडळी चक्क बस थांबविण्याच्या फलाटावर वाहने उभी करतात. येथे नियमांची सर्रास पायमल्ली होत असून परिवहन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)