‘से नो टू क्राईम’ उपक्रम ठरतोय गुन्हेगारीवर मलम
By Admin | Updated: February 3, 2017 01:03 IST2017-02-03T01:03:07+5:302017-02-03T01:03:07+5:30
समाजात गुन्हेगारी वाढविण्यास कारणीभूत ठरतात ते नागरिक, विद्यार्थ्यांमधील व्यसनाधिनता.

‘से नो टू क्राईम’ उपक्रम ठरतोय गुन्हेगारीवर मलम
जिल्ह्यातील क्राईम रेट घटला : संदीप दिवाण यांची माहिती
चिमूर: समाजात गुन्हेगारी वाढविण्यास कारणीभूत ठरतात ते नागरिक, विद्यार्थ्यांमधील व्यसनाधिनता. व्यसनाधीनता कमी करण्यासाठी समाजात जागृती करण्यासाठी काही उपक्रम राबविले तर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम होतो. चंद्रपूर जिल्ह्यात एक वर्षाअगोदर झालेली दारुबंदी, यामुळेही काही प्रमाणात गुन्हेगारी कमी झाली. यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी समाजातील विद्यार्थी जीवनात समपुदेशन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात ‘से-नो टू क्राईम’ हा महाविद्यालयात पोलीस विभागाकडून उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाने जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिली.
चिमूर येथे पत्रकार असोसिएशनच्या वतीने आयोजित शालेय समूह नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ते चिमुरात आले होते. प्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा शिल्पा राचलवार, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मीक, विक्रीकर निरीक्षक रवींद्र गायगोले, ठाणेदार दिनेश लबडे, बांधकाम विभागाचे मंत्रालयातील मुख्य अभियंता डॉ. महेश डेकाटे, गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. जगन्नाथ दडवे, डॉ. अश्विन अगडे, अमोल कोल्हे उपस्थित होते.
संदीप दिवाण पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर शहराला क्रांतीचा वारसा असल्याने चिमूरचे विशेष महत्व आहे. जिल्हात से-नो उपक्रमामधून महाविद्यालयातील तरुणामध्ये से-नो ड्रग्स, से-नो वाईन, से-नो ट्रप याबाबत जागृती केली. या जागृतीमुळे जिल्ह्यातील काही प्रमाणात क्राईम रेट कमी झाला आहे. समाजात व जीवनात शिस्त न पाडल्याने आपले नुकसान होते. यासाठी व्यसननाधिनता कारण ठरते. म्हणून विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.
व्यसनामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे देशात वर्षाला जवळपास सात हजार पेक्षा जास्त नागरिक अपघातात बळी जातात. विद्यार्थ्यांचा जीवनात पालकांची भूमिका फार महत्वाची असते, असेही दिवाण यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
प्रास्ताविक प्रा. चुन्नीलाल कुडवे, संचालन स्वाती जामगडे, ज्योती खोब्रागडे यांनी केले तर आभार राजकुमार चुनारकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)