नऊ बेवारस कुत्र्यांना मिळाले हक्काचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:22+5:302021-03-09T04:31:22+5:30
चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे, मांजर तसेच अन्य प्राणी आहे. अनेकवेळा त्यांचे अपघात होतात, तर काही ...

नऊ बेवारस कुत्र्यांना मिळाले हक्काचे घर
चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे, मांजर तसेच अन्य प्राणी आहे. अनेकवेळा त्यांचे अपघात होतात, तर काही खायला मिळत नसल्याने कुपोषणाने मृत्युमुखी पडतात. या प्राण्यांचा जीव वाचावा, त्यांनाही जगण्याचा हक्क मिळावा यासाठी येथील प्यार फाऊंडेशन मागील काही वर्षांपासून काम सुरू केले आहे. दरम्यान, फाऊंडेशनमध्ये अशा प्राण्यांची संख्या सध्या वाढली आहे. त्यामुळे या प्राण्यांना हक्काचे घर देण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून दत्तक प्रक्रिया पार पाडली जात आहे. मागील दोन दिवसांत तब्बल नऊ बेवारस कुत्र्यांना, तसेच एका मांजराला हक्काचे घर मिळवून देण्यात फाऊंडेशनच्या सदस्यांना यश आले आहे.
बेवारस कुत्रे, मांजर तसेच अन्य प्राणी फाऊंडेशनध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे. औषधोपचारानंतर तंदुरुस्त झालेल्या या प्राण्यांना ठेवण्याचा प्रश्न येतो. सद्य:स्थितीत फाऊंडेशनकडे २७० च्या वर विविध प्राणी आहे. त्यामुळे दुरुस्त झालेल्या प्राण्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सदस्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान, येथील रामाळा तलाव परिसरात कॅम्प लावून दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये नऊ कुत्र्यांना, तसेच एका मांजराला पालक मिळवून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दत्तक प्रक्रियेनंतर सर्वांनी या कुत्र्यांना घरी नेले आहे.
--
दोन महिन्यांच्या कुत्र्यांचा समावेश
दत्तक दिलेल्या बेवारस कुत्र्यांमध्ये दोन महिने वयाचे कुत्रे आहे. यातील सर्व गावठी आहे. काही नागरिक पैसे मोजून कुत्रे खरेदी करतात. मात्र, या बेवारस कुत्र्यांना दत्तक घेऊन पैशाची बचत, तसेच पालकपोषणाचे समाधान वेगळेच असते. त्यामुळे अधिकाधिक सदस्यांनी फाऊंडेशनधील प्राण्यांना दत्तक घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
बाॅक्स
उच्चशिक्षित असलेल्या देवेंद्र रापेल्ली यांनी समवयस्क युवकांना सोबत घेऊन प्यार फाऊंडेशन ही संस्था सुरू केली. या माध्यमातून जखमी, तसेच बेवारस प्राण्यांची सेवा येथे केली जात आहे. दिवसेंदिवस येथे बेवारस प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यांना त्यांच्या पालनपोषणाचा खर्चही आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे प्रत्येक प्राण्यांना हक्काचे घर मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
---
लसीकरणासंदर्भात माहिती
प्राण्यांना दत्तक दिल्यानंतर त्यांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याचे सांगण्यात येत आहे. विशेषत: लसीकरणासंदर्भात कधी काळजी घ्यायची यासंदर्भात सदस्य संबंधित नागरिकांना समजावून सांगतात.
---
कोट
प्रत्येक प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे. अनेकवेळा रस्त्यावरील प्राण्यांना खायला काही मिळत नाही, तर काही वेळा अपघातात ते जखमी होतात. अशावेळी त्यांचा प्राण जातो. त्यामुळे फाऊंडेशनच्या माध्यमातून या प्राण्यांची मदत केली जात आहे. त्यांना जगण्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
देवेंद्र रापेल्ली
अध्यक्ष, प्यार फाऊंडेशन, चंद्रपूर.