ताडोबा व्याघ्र प्रकल्पात भूमिगत विद्युत वाहिनीसाठी नऊ कोटींचा निधी
By Admin | Updated: August 10, 2016 00:29 IST2016-08-10T00:29:43+5:302016-08-10T00:29:43+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात अखंडित विद्युत पुरवठा करण्याच्या अनुषंगाने चंद्रपूर तालुक्यातील पद्मापूर येथे...

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात भूमिगत विद्युत वाहिनीसाठी नऊ कोटींचा निधी
सुधीर मुनगंटीवार: पद्मापूर येथे ३३/ ११ के. व्ही. विद्युत उपकेंद्र
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात अखंडित विद्युत पुरवठा करण्याच्या अनुषंगाने चंद्रपूर तालुक्यातील पद्मापूर येथे ३३/ ११ के. व्ही. विद्युत उपकेंद्राची निर्मिती तसेच पद्मापूर येथून मोहर्ली पर्यंत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी ९.५० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
शासनाच्या महसूल व वनविभागाने सोमवार ८ आॅगस्ट रोजीच्या पत्रान्वये सदर निधी उपलब्ध केल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर तसेच क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना कळविले आहे.
राज्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धन उत्कृष्टपणे झाल्याने मागील काही वर्षात प्रकल्पात भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत भरीव वाढ झाली आहे.
तसेच व्याघ्र प्रकल्पाचे नावदेखील जागतिकस्तरावर घेतले जात आहे. प्रकल्प क्षेत्रात भेट देण्यासाठी पाच ते सहा प्रवेशद्वारे आहेत, तथापि मोहर्ली येथून जाण्यास पर्यटकांची प्रथम पसंती असते. त्यामुळे मोहर्ली व त्या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली असून, पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी अनेक साधने तयार झाली आहेत.
प्रकल्पास भेट देणाऱ्या पर्यटकांना मोहर्ली व परिसरात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी या परिसरात विद्युत पुरवठयाबाबत अनेकदा समस्या निर्माण होतात.
या समस्येवर उपाययोजना म्हणून पद्मापूर येथे विद्युत उपकेंद्र उभारणी करणे व मोहर्लीपर्यंत भूमिगत विद्युतवाहीनी जोडणी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून हे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)