शेतकरी आत्महत्येची नऊ प्रकरणे मंजूर
By Admin | Updated: March 2, 2015 01:07 IST2015-03-02T01:07:30+5:302015-03-02T01:07:30+5:30
शेतकरी आत्महत्या करण्याचे कारण शोधत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी याकरिता जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.

शेतकरी आत्महत्येची नऊ प्रकरणे मंजूर
वरोरा: शेतकरी आत्महत्या करण्याचे कारण शोधत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी याकरिता जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीची नुकतीच बैठक झाली. यामध्ये शेतकरी आत्महत्येचे १० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील नऊ प्रकरणे पात्र ठरली तर एक प्रकरण अपात्र ठरवण्यात आले.
गत दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात वरोरा तालुक्यातील अभिमन कानुजी काळे बोरगाव (दे.), दशरथ नथ्यू नागरकर निमसडा, संतोष नारायण नक्षीणे पिजदुरा, ब्रह्मपुरी तालुक्यातील शंकर श्रीराम शेंडे चोरगाव, बालाजी शिवराम वनकर ब्रह्मपुरी, मुर्लीधर ऋषी चिमूरकर हळदा, सुनील बक्षिजी ठोरे, राजेंद्र निवृत्त गायकवाड जिवती, महादेव दशरथ नन्नावरे तळोधी ता. चिमूर, सुभाष वासुदेव भोगेकर धानापूर ता. गोंडपिपरी अशा १० शेतकऱ्यांची प्रकरणे समिती समोर ठेवण्यात आली.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर बँकाचे व खाजगी रित्या मोठ्या प्रमाणात कर्ज होते. सततची नापिकी यामुळे त्यांनी आपले जिवन संपविल्याचे मानले जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये, याकरिता शासनाच्या वतीने एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते. परंतु, त्यांच्याकडील कर्ज हप्त्याने भरावे लागणार आहे. ब्रह्मपुरी येथील बालाजी बनकर या शेतकऱ्यांचे प्रकरण अपात्र ठरले आले असून पात्र ठरलेल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने मदत केली जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्ती ठार झाल्यास आठ लाख रुपये दिले जाते. सततची नापिकी व कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्या होत असून आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना मिळणारी मदत अत्यल्प आहे. यामध्ये वाढ करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)