एक बादली पाण्यासाठी जागावी लागते रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:48 IST2018-05-26T22:48:35+5:302018-05-26T22:48:49+5:30
खापरी (धर्मु) गावातील पाण्याच्या विहिरी व बोअरवेल कोरडे पडले. नळयोजनेचे अन्य स्त्रोत आटल्याने चार दिवसांतून एकदाच पाणी येते. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे.

एक बादली पाण्यासाठी जागावी लागते रात्र
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमुर : खापरी (धर्मु) गावातील पाण्याच्या विहिरी व बोअरवेल कोरडे पडले. नळयोजनेचे अन्य स्त्रोत आटल्याने चार दिवसांतून एकदाच पाणी येते. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे.
चिमूर शहरापासून दहा किमी अंतरावरील खापरी (धर्मु) गावात पाणी पुरवठा करण्यासाठी २० वर्षांपूर्वी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आली होती. तेव्हापासुन या योजनेतून खापरी येथील नागरिकांना पाणी मिळू लागले. मात्र बदलते वातावरण व उष्णतेने नळ योजनेचे सर्व स्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे नळाद्वारे चार दिवसाआड दोन बादली पाणी मिळणेही कठीण झाले. गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन सार्वजनिक विहिरी आहेत. सोबतच दोन बोरवेल असूनही पाणी मिळत नाही. विहिरीचे झ़रे कोरडे पडल्याने पाणी आटले. त्यामुळे नागरिकांना बादलीभर पाण्यासाठी रात्री जागावी लागते. दिवस उजाळला की पाण्याची चिंता सुरू होते. एक हंडा भरण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने महिला हैराण झाल्या आहेत. काही महिला शेतातील विहिरीवर पायपिट करून हंडाभर पाणी आणून दिवस काढत आहेत. बैलबंडी असणारे कुटुंब ड्रम भरुन पाणी आणून दैनंदिन गरज भागवित आहेत. खापरी गावात पाण्याचा गंभीर प्रश्न असतानाही प्रशासनाने याकडे अद्याप लक्ष दिले नाही, असा आरोप गावकरी करीत आहेत.
गावातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेवून सरपंच प्रकाश मेश्राम यांनी जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, तहसीलदार, संवर्ग विकास अधिकाऱ्यांच निवेदनाद्वारे लक्ष दिले होते. उन्हाळ्यातील टंचाई दूर करण्यासाठी गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावी, अशी मागणी केली होती. मात्र अजुनही गावात उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी शिवारात भटकंती करावी लागत आहे. मागील वर्षीदेखील पाणी टंचाई निर्माण झाली होती. या गावात दरवर्षी हीच समस्या कायम असताना प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना केल्यास समस्या दूर होवू शकते. पण, लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने समस्या कायम आहे.
आधी पाणी, मग दुसरे काम
गावात भीषण पाणी टंचाई असल्याने गावातील महिला व पुरुष प्रथम पाण्यालाच सर्वप्रथम महत्त्व देत आहेत. बादलीभर पाणी मिळाल्यानंतरच दुसरे काम करतात, अशी परिस्थिती गावात निर्माण झाली. पाण्यासाठी विहिरी व दोन बोरवेल असूनही निराशा वाट्याला येत आहे. २० वर्षांपूर्वी उभारलेल्या नळ योजनेसाठी कायमस्वरूपी जलस्त्रोत निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
टॅकरने पाणी पुरवठा करण्यासाठी तहसीलदार, सवर्ग विकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाला निवेदन दिले. मात्र प्रशासनाने गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.
- प्रकाश मेश्राम,
सरपंच, ग्रामपंचायत खापरी