शुद्ध ऑक्सिजनसाठी नवविवाहित जोडपी करताहेत वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:10+5:302021-04-26T04:25:10+5:30
कळमना ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम सास्ती : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजनसाठी ताटकळत राहून ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागत ...

शुद्ध ऑक्सिजनसाठी नवविवाहित जोडपी करताहेत वृक्षलागवड
कळमना ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
सास्ती : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजनसाठी ताटकळत राहून ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागत आहे. अशा स्थितीत भविष्यात आपल्या गावातील नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळून त्यांची प्रकृती नेहमी सुस्थितीत राहावी, असा उदात्त हेतू ठेवून गावात होणाऱ्या प्रत्येक लग्नसोहळ्याप्रसंगी नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करून या नवदाम्पत्यांची आयुष्यभराची आठवण जोपासण्याचा स्तुत्य उपक्रम राजुरा तालुक्यातील कळमना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविला जात आहे.
राजुरा तालुका तसा औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रचलित आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, कोल वॉशरीज, लागूनच असलेल्या कोरपना तालुक्यात मोठमोठे सिमेंट उद्योग आहेत. त्यामुळे या परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना श्वसनाचे आजार होत आहेत; परंतु याकडे उद्योजक किंवा प्रशासन दुर्लक्ष करीत असून, प्रदूषणावर मात करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येते. या उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमविला जात असला तरी परिसरातील नागरिकांना मात्र हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. देशात सध्या कोरोनामुळे मोठे संकट उभे ठाकले आहे. रुग्णांना ऑक्सिजनसाठी मारामार करावी लागत आहे. अशा परिस्थितीत राजुरा तालुक्यातील कळमना ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्या कावळे यांच्या पुढाकारात कोरोनाकाळात गावात होणाऱ्या प्रत्येक लग्नसोहळ्यातील नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते गावात वेगवेगळ्या झाडांची लागवड करून गावातील नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळावा तसेच प्रदूषणावर मात करण्याचा एक प्रयत्न म्हणून उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव गावकऱ्यांसमोर मांडला. गावातील नागरिकांनीसुद्धा यास प्रचंड प्रतिसाद देऊन झाडांची लागवड करणे, त्याची जोपासना करणे याकरिता लागणारी आर्थिक मदतही देऊ करून हा उपक्रम सुरू केला. या लग्नसोहळ्यानंतर नवविवाहितांच्या हस्ते गावात विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात करण्यात येत आहे. नुकतेच गावातील अस्मिता शंकर ताजणे तसेच पूजा अच्युतराव वांढरे या दोन्ही मुलींच्या विवाहप्रसंगी गावात वृक्षांची लागवड करण्यात आली असून, येणाऱ्या काळात गावात होणाऱ्या सर्वच लग्नसोहळ्यांप्रसंगी अशा प्रकारे झाडे लावण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.