नव्याने पर्यटन सुरू झालेल्या चोरा, चिचोली जंगलात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:12+5:302021-03-31T04:28:12+5:30
चंद्रपूर : पर्यटन सफारी सुरू करून वनविभागाने पर्यटनातून महसूल गोळा करण्यासाठी भद्रावती तालुक्यातील चोरा तसेच चिचोली बिटामध्ये नव्याने पाऊल ...

नव्याने पर्यटन सुरू झालेल्या चोरा, चिचोली जंगलात आग
चंद्रपूर : पर्यटन सफारी सुरू करून वनविभागाने पर्यटनातून महसूल गोळा करण्यासाठी भद्रावती तालुक्यातील चोरा तसेच चिचोली बिटामध्ये नव्याने पाऊल उचलले आहे. मात्र अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत येथील जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागली असून वनसंपदा नष्ट झाली आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांची अन्नसाखळीही तुटली आहे. ही आग नेमकी कशी लागली हे स्पष्ट झाले नसले तरी मोहफूल तसेच तेंदुपत्तासाठी आग लावली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीच्या भक्षस्थानी किमान ५ हजार एकर जंगल आल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. ताडोबा कोअर क्षेत्राशेजारी असलेल्या बफर क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहे. या प्राण्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी जंगलाला आग लागण्याच्या घटनांवर प्रतिबंध करणे अद्यापही वनविभागाला जमलेच नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वन्यप्राण्यांची अन्नसाखळीही तुटत आहे. भद्रावती तालुक्यातील चोरा, चिचोली जंगलाला मागील तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. यामध्ये किमान ५ हजार एकर परिसर आगीच्या कवेत आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बफर तसेच प्रादेशिक परिसराचाही समावेश आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून वनपर्यटन सुरू केले, मात्र या आगीमुळे पर्यटनावरही परिणाम पडणार असल्याचे बोलले जात आहे.
कोट
चोरा तसेच चिचोली परिसरातील जंगलाला आग लागली होती. मात्र सध्या आग विझविण्यात आली आहे. मोहफूल संकलन करणाऱ्या काहींनी आग लावली असावी, असा अंदाज आहे. मात्र अद्यापपर्यंत नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान, चिचोरी गावात वनविभागाने बैठक घेतली असून गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण तसेच आगीचे नेमके कारण शोधून काढले जात आहे.
- सारिका जगताप, उपवनसंरक्षण, भद्रावती
बाॅक्स
पर्यटनावर परिणाम
एक महिन्यापूर्वी म्हणजेच, २९ फेब्रुवारी रोजी भद्रावती-चोरी पर्यटन सफारी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली. एका महिन्यातच जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागून वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे येथील वन्यप्राणी सौरावैरा झाले असून या आगीचा पर्यटनावरही परिणाम पडणार आहे.
बाॅक्स
मौल्यवान लाकूड तसेच वन्य औषधी नष्ट
या जंगलामध्ये साग तसेच इतर मौल्यवान वृक्ष आहे. सोबतच बांबू तसेच इतर औषधी वनस्पतीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र आगीमुळे या सर्वांवर मोठा परिणाम झाला आहे.