नवीन पाईपलाईन ठरली पाणी पुरवठ्यात नापास
By Admin | Updated: April 14, 2016 01:12 IST2016-04-14T01:12:35+5:302016-04-14T01:12:35+5:30
येथील वॉर्ड नं. १ मधील नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली ओरड लक्षात घेता गत फेब्रुवारी महिन्यात नवीन पाईप लाईन टाकण्यात आली.

नवीन पाईपलाईन ठरली पाणी पुरवठ्यात नापास
नागभीड : येथील वॉर्ड नं. १ मधील नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली ओरड लक्षात घेता गत फेब्रुवारी महिन्यात नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. पण योग्य नियोजन करण्यात न आल्याने पाणी पुरवठा करण्यास ही पाईप लाईन अपयशी ठरली आहे.
येथील वॉर्ड नं. १ हा विस्ताराने मोठा आहे. या वॉर्डात २ हजारच्या आसपास मतदार आहेत. सिनेमा टॉकीजजवळ असलेला टोपरेबाबा चौक, मानी मोहल्ला, सिद्धीविनायक कॉलनी, या वसाहतीसोबत अन्य वसाहतींचाही या वॉर्डात समावेश आहे. येथील टोपरे बाबा चौक आणि त्या परिसरातील नागरिकांना नागभीड मध्ये कार्यरत असलेल्या तपाळ पाणी पुरवठा योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात कधी मिळालेच नाही. त्यामुळे येथील लोकांची नेहमीच पाण्यासाठी ओरड असायची. लोकांची ही ओरड लक्षात घेऊन नागभीड ग्रामपंचायतीने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नवीन पाईप लाईनचे काम करण्यात आले.
नवीन पाईप लाईन टाकण्यात आल्याने आता तरी पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी लोकांची अपेक्षा होती. नविन पाईपलाईनमुळे नागरिकांचे जुन्या जोडण्या खंडीत झाल्या. त्यामुळे नवीन जोडण्या कराव्या लागल्या. तरी नवीन टॉकीचे बांधकाम करावे लागले. पण नवीन पाईप लाईन टाकताना ग्रामपंचायतीने योग्य नियोजन न केल्यामुळे या चौकातील व परिसरातील नागरिकांची पाण्याविषयीची अपेक्षा भंग पावली आहे.
वास्तविक टोपरेबाबा चौकाजवळच गोवर्धन चौक आहे आणि गोवर्धन चौकातून तपाळ पाणी पुरवठा योजनेची मोठी पाईपलाईन गेली आहे. पण या पाईपलाईनला ही नवीन पाईप लाईन न जोडता बागडे यांच्या घराजवळून गेलेल्या छोट्या पाईप लाईनला ही नवीन पाईप लाईन जोडण्यात आली. त्यामुळेच पाण्याचा पुरवठा होत नाही, असा आरोप या वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. गोवर्धन चौकातून गेलेल्या पाईपलाईनला ही पाईप लाईन जोडण्यात आली असली तर पुरेसे पाणी मिळाले असते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. टोपरेबाबा चौक आणि मानीमोहल्ला या वस्तीत जवळपास १०० घरांची लोकवस्ती आहे. यातील बहुतेक लोकांना विहीर किंवा विंधन विहीरीच्या पाण्यावर आपल्या गरजा पूर्ण करावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)