लालपेठ प्रभागाकडे महापालिकेचे दुर्लक्ष
By Admin | Updated: January 31, 2015 01:14 IST2015-01-31T01:14:18+5:302015-01-31T01:14:18+5:30
महानगरपालिकेच्या हिंदुस्थान लालपेठ प्रभागात ७५ टक्के भागात वेकोलिच्या वसाहती आहेत. या वसाहतीत काही सुविधा वेकोलि प्रशासन पुरविते.

लालपेठ प्रभागाकडे महापालिकेचे दुर्लक्ष
चंद्रपूर महानगरपालिकेच्या हिंदुस्थान लालपेठ प्रभागात ७५ टक्के भागात वेकोलिच्या वसाहती आहेत. या वसाहतीत काही सुविधा वेकोलि प्रशासन पुरविते. मात्र महानगरपालिकेनेही या वसाहतीत सोई-सुविधा पुरविणे गरजेचे आहे. मात्र महानगरपालिका या भानगडीत पडतच नसावे, असेच दिसून येते. हिंदुस्थान लालपेठ प्रभागात आज शुक्रवारी लोकमत चमूने फेरफटका मारला असता नागरिकांनी विविध समस्या सांगितल्या. या समस्यांची सोडवणूक मागील १५ वर्षांपासूनही झाली नसल्याचेही सांगितले. हिंदुस्थान लालपेठ कॉलरी क्रमांक २ मध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य दिसून आले. येथील वेकोलिच्या क्वार्टरच्या मागे सांडपाण्याच्या नाल्या आहेत. मात्र अतिशय लहान आहेत. आता या नाल्या मोडकडीस आल्या आहेत. या नाल्यांवर कुठेच स्लॅब टाकण्यात आल्याचे दिसून येत नाही. उल्लेखनीय असे की या नाल्यांची नियमित सफाईदेखील केली जात नाही. त्यामुळे या नाल्या आता घाणीने तुडुंब भरल्या असून येथील सांडपाणी वाहतानाही दिसत नाही. या वसाहतींमध्ये कचराकुंड्यांचाही अभाव आहे. त्यामुळे कचरा, प्लॅस्टिक पिशव्या, टाकाऊ वस्तू, शिळे अन्न वसाहतीतील मोकळ्या जागेत विखुरलेले दिसते. या घाणीमुळे डुकरांचाही या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. लोकमत चमूने या भागात फेरफटका मारला असता थोड्या थोड्या अंतरावर कचरा विखुरलेला दिसला. महानगरपालिकेकडून हा कचरा महिनोमहिने उचललाच जात नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे या परिसरात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात तर माशांचाही फार उपद्रव असतो, असेही येथील नागरिकांनी सांगितले. या परिसरातील काही रस्तेही उखडलेले आहेत. लालपेठ कॉलरी क्रमांक १ मध्येही रस्त्यांचा प्रश्न बिकट आहे. या परिसरात काही ठिकाणी नवीन सिमेंट रस्ते बांधलेले दिसले. मात्र काही रस्ते उखडलेलेच आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डेही पडले आहेत. या परिसरातही घाणीचे साम्राज्य दिसून आले. या कॉलरी परिसरात मोठा नाला वाहते. या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचून असल्याचे दिसून आले. पावसाळ्यात या नाल्यातील पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रभागातील हुडकू कॉलनी परिसरातही रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे. रस्ते उखडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेने रस्त्यांची कामे प्राधान्याने करणे गरजेचे आहे. या ठिकाणी आज नाल्यांची सफाई होताना दिसली. मात्र ती नियमित होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. घाणीचे साम्राज्यही परिसरात आहे.