अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात एकसंघ लढ्याची गरज
By Admin | Updated: November 22, 2015 00:57 IST2015-11-22T00:57:53+5:302015-11-22T00:57:53+5:30
शिक्षण क्षेत्रात शासनाने अन्यायकारक निर्णय लादले आहेत. भविष्यात यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था उद्धवस्त होईल.

अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात एकसंघ लढ्याची गरज
प्रभाकर मामुलकर : ९ व १० डिसेंबरला शाळा बंद आंदोलन
राजुरा : शिक्षण क्षेत्रात शासनाने अन्यायकारक निर्णय लादले आहेत. भविष्यात यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था उद्धवस्त होईल. गुणवत्तेच्या नावावर शिक्षणसंस्था व कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न शासन करू पाहत आहे. शासनाचा छुपा डाव हाणून पाडण्यासाठी संस्था चालक व सर्व संघटनांनी एकत्र लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांनी राजुरा येथील सहविचार सभेत व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्हा शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे संस्थाचालक, विविध संघटनांच्या पदाधिकारी व मुख्याध्यापकांची सहविचार सभा गुरूवारी पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार प्रभाकर मामुलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून कृती समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल शिंदे, सचिव सूर्यकांत खनके, उपाध्यक्ष सुधाकर अडबाले, सहसचिव राजु साखरकर, प्रदिप गर्गेलवार, सर्वोदय मंडळाचे सचिव भारत पोटदुखे, अनिल मुसळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, आबीद अली, सतिश धोटे, अॅड. मुरलीधर धोटे, दत्तात्रय येगीनवार, सुधाकर कुंदोजवार, लक्ष्मण चौबे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शिक्षक परिषदचे कार्यवाह रामदास गिरडकर, श्रीहरी शेंडे, नामदेवराव बोबडे यांची उपस्थिती व्यासपिठावर होती.
कृती समितीच्या वतीने १० डिसेंबरला नागपूर विधानसभेवर मोर्च्याचे आयोजन केले आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)