‘त्या’ मोहिमेतून बोध घेण्याची गरज

By Admin | Updated: June 26, 2016 00:47 IST2016-06-26T00:47:07+5:302016-06-26T00:47:07+5:30

तळोधीला रुजू होताच वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंड येथील संरक्षित जंगलात झालेले अतिक्रमण ज्या पद्धतीने हटविले, ती पद्धत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे...

The need to take inspiration from 'that' campaign | ‘त्या’ मोहिमेतून बोध घेण्याची गरज

‘त्या’ मोहिमेतून बोध घेण्याची गरज

कुणाच्या संमतीने झाले होते अतिक्रमण? : झारीतील ‘त्या’ शुक्राचार्यांवर कारवाई व्हावी
घनश्याम नवघडे नागभीड
तळोधीला रुजू होताच वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंड येथील संरक्षित जंगलात झालेले अतिक्रमण ज्या पद्धतीने हटविले, ती पद्धत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. सोनटक्के यांच्या कार्यपध्दतीचे अनुकरण करून इतर अधिकाऱ्यांनीही ही मोहीम राबविली तर वनविभागाच्या इतर अनेक जागेवर झालेले अतिक्रमण हटण्यास वेळ लागणार नाही.
जमीन तीच आहे. मात्र लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत लोकांच्या गरजा वाढत आहेत. २५ ते ३० वर्षांपूर्वी २० एकराचा कास्तकार असलेल्या शेतकऱ्यांचे वारस आता अल्पभूधारक झाले आहेत. मात्र घरातील खाणाऱ्यांची तोंडे वाढल्याने एक वेगळीच चिंता या अल्पभूधारक शेतकऱ्यासमोर निर्माण झाली आहे. या चिंतेतूनच अतिक्रमणाचे प्रकार घडत आहेत.
अतिक्रमण ही त्या शेतकऱ्यांची गरज असली तरी कायदा मात्र कदापि हे माान्य करणार नाही. या कायद्याला बांधील राहूनच सोनटक्के यांनी पाऊल उचलले आहे. बोंड येथे वनविभागाच्या जागेवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले अतिक्रमण ही काही एक- दोन दिवसातील गोष्ट निश्चितच नाही. महिना दोन महिने तर निश्चितच लागले असतील. मग या महिने दोन महिन्यात वनविभागात महत्त्वाचा दुवा असलेल्या येथील बीट गार्ड, क्षेत्र सहाय्यक हे काय करीत होते? हा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
माहिती तर अशी आहे की हे अतिक्रमण एक-दोन नाही तर गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू आहे. जवळपास ३१ हेक्टरवर हे अतिक्रमण करण्यात आले आहे. आणि ३१ शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. हे अतिक्रमण करण्यासाठी एकेका शेतकऱ्याने ७० ते ८० हजार रुपये खर्च केले आहेत. हे होत असताना बोंड बिटाचे वनरक्षक आणि क्षेत्र सहाय्यक वनविभागाची चाकरी करीत होते का? अन्य कोणाची, हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न लोक विचारत आहेत.
तळोधी वनपरिक्षेत्रामध्ये सोनटक्केंसारख्या जागरुक अधिकारी रुजू झाल्या आणि त्यांनी बारकाईने यात लक्ष घातले म्हणून हे प्रकरण उघड झाले नाही तर सारेच शेत कुंपणाने खाल्ले असते आणि म्हणूनच हे एवढ्यावरच न थांबविता या प्र्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. ७० ते ८० एकर जमिनीवर अतिक्रमण झाले ते कोणाच्या आशीर्वादाने हे सत्य बाहेर यायला पाहिजे आणि यात जे खरोखरच दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे.
यातील दोषींवर ही कारवाई यासाठी की त्यांनी या अतिक्रमणास मज्जाव केला नाही. सोबतच ते लोकांच्या भावनेशीही खेळले. या जागेवर लोकांनी अतिक्रमण केल्यानंतर त्यांचे आणि या जागेचे एक नाते निर्माण झाले होते. या जागेच्या माध्यमातून त्यांनी उद्याची स्वप्ने रंगविली होती. पण आज त्यांच्या या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे. वेळीच त्यांनी या अतिक्रमणास अटकाव केला असता तर अतिक्रमणधारकांवर ही अवस्था आली नसती आणि बोंड येथे जे वातावरण निर्माण झाले, ते वातावरण निर्माण झाले नसते, एवढे यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

Web Title: The need to take inspiration from 'that' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.