विकास प्रक्रियेत लोकसहभागाची नितांत आवश्यकता
By Admin | Updated: December 28, 2015 01:23 IST2015-12-28T01:23:48+5:302015-12-28T01:23:48+5:30
राज्य सरकार असो वा केंद्र सरकार आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी सत्तेत आलो आहोत.

विकास प्रक्रियेत लोकसहभागाची नितांत आवश्यकता
सुधीर मुनगंटीवार : कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
राजुरा : राज्य सरकार असो वा केंद्र सरकार आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी सत्तेत आलो आहोत. सर्वसामान्य नागरिकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून आम्ही कार्यरत आहोत. वेकोलिच्या कोळसा खाणींसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्या देशाच्या विकासासाठी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका वेकोलिने कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. तरूणांना कौशल्य विकासाच्या दृष्टीने, रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आमच्या विनंतीला मान देत दुर्गापूर येथे कौशल्य विकास केंद्र वेकोलि सुरू करीत आहे. ही निश्चितच अभिनंदीय बाब आहे. या केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण द्या, आम्ही राज्य सरकारकडून प्रशिक्षीत तरूणांना व्यवसायासाठी किट उपलब्ध करून देऊ. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आज रविवारी वेकोलिच्या पवनी २ व ३ परियोजनेच्या तसेच कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन समारंभात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, राज्य सरकारच्या माध्यमातून गडचांदूर, राजुरा, ब्रह्मपूरी, सावली, पोंभुर्णा, मुल, बल्लारपूर या शहारांसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. चंद्रपूर शहरातील विकासाकामांसाठी ५० कोटी रू. निधी आम्ही उपलब्ध केला आहे. विकासप्रक्रियेत नागरिकांचा सहभाग अतिशय गरजेचा आहे. लोकसहभागाशिवाय पुढे जाता येणार नाही, असेही ते म्हणाले.
वेकोलिच्या पवनी २ व ३ परियोजनेच्या तसेच कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. संजय धोटे, वेकोलिचे सीएमडी मिश्रा, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, बल्लारपूर क्षेत्राचे महाप्रबंधक वैश्यकियार, डायरेक्टर टेक्निकल एस. एस. अली, भाजपा नेते विजय राऊत, साखरीच्या सरपंच बेबीनंदा कोडापे, वरोडाचे सरपंच साईनाथ देठे, पवनीच्या सरपंच सरला फुलझेले, राजीव गोलीवार, सतीश धोटे, राजू घरोटे, वाघू गेडाम, राहुल सराफ, अरुण मस्की आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेकोलिच्या नवीन परियोजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात भर घातली जाणार असल्याचे प्रतिपादन केले. या परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देणे हे आमचे आद्य कर्तव्य असून त्यासाठी आम्ही सदैव कटिबध्द असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)