नायब तहसीलदाराविना कार्यालय वाऱ्यावर
By Admin | Updated: May 13, 2016 01:05 IST2016-05-13T01:05:52+5:302016-05-13T01:05:52+5:30
गेल्या दीड वर्षापूर्वी थाटात उद्घाटन झालेले तळोधी (बा.) येथील नायब तहसील कार्यालय तहसीलदाराविना ओस पडले आहे.

नायब तहसीलदाराविना कार्यालय वाऱ्यावर
नागरिकांच्या कामांचा खोळंबा : रिक्त पद तात्काळ भरण्याची मागणी
तळोधी (बा.) : गेल्या दीड वर्षापूर्वी थाटात उद्घाटन झालेले तळोधी (बा.) येथील नायब तहसील कार्यालय तहसीलदाराविना ओस पडले आहे. यामुळे तळोधी (बा.) व परिसरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
तळोधी (बा.) व परिसरातील ४८ गावांसाठी हे नायब तहसीलदार कार्यालय महत्त्वाचे आहे. तळोधी (बा.) येथील जनतेची कामे लवकरात लवकर व्हावी, याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधीनी नागरिकांच्या या जुन्या मागणीची पुर्तता महसूल मंत्र्यांकडून पुर्ण करुन घेतली. २६ जानेवारी २०१५ रोजी तळोधी (बा.) येथे नायब तहसील कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले.
त्या दिवसापासून येथे नायब तहसीलदार म्हणून खटी यांची नियुक्ती करण्यात आली व लिपीक म्हणून देगमवार तर शिपाई म्हणून व्ही. यु. खडसे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु पदभार सांभाळल्यापासून दीड महिना त्यांनी कारभार सांभाळला. त्यानंतर नायब तहसीलदार खटी हे सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्या जागेवर नायब तहसीलदार म्हणून प्रकाश मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु तेसुद्धा चार महिने कार्यरत राहिले. त्यानंतर तेदीखील सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या ठिकाणी कुणीच आले नाही. नायब तहसीलदारांविना हे कार्यालय ओस पडले आहे. तळोधी (बा.) गावाची लोकसंख्या १५ हजारांच्यावर असताना व परिसरातील ४८ गावे या कार्यालयांतर्गत येत असताना येथील नायब तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांचीच नियुक्ती करू नये, ही नागरिकांसाठी दुर्दैवाची बाब ठरली आहे. या भागातील जनतेचे शपथपत्रांची कामे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व इतर कामासाठी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधीनी अच्छे दिनाच्या नावाखाली महसूल मंत्र्यांकडून नायब तहसील कार्यालय तळोधी (बा.) येथे खेचून आणले. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदाराचेच पद रिक्त असल्यामुळे या भागातील जनतेला कामे करण्याकरिता नागभीडला जावे लागत आहे. एकाच दिवशी कामे होत नसल्यामुळे येथील शेतकरीवर्गाला तसेच शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. येथील शिपाई बी.यू. खडसे हे मात्र तहसील कार्यालयात दिवसभर बसून असल्याचे दिसून येते. मात्र अधिकारीच नसल्याने तेही हतबल ठरत आहेत. (वार्ताहर)
तळोधी येथे नुकतेच नायब तहसील कार्यालय झाले. येथे नायब तहसीलदार नसल्यामुळे तळोधी (बा.) व परिसरातील शेतकरीवर्गाला आणि शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय कामासाठी नागभीडला जावे लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीनी या समस्येकडे लक्ष देवून त्वरित नायब तहसीलदारांचे रिक्त पद भरावे. - मनोज वाढई
सामाजिक कार्यकर्ता, तळोधी (बा.)