तंटामुक्त समिती निवडीचा नवरगाव ग्रामपंचायतीला विसर
By Admin | Updated: April 23, 2015 01:02 IST2015-04-23T01:02:34+5:302015-04-23T01:02:34+5:30
येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची निवड अजूनही झालेली नाही.

तंटामुक्त समिती निवडीचा नवरगाव ग्रामपंचायतीला विसर
नवरगाव : येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची निवड अजूनही झालेली नाही. जुन्या समितीचीही फेरनिवड मागील दोन वर्षांपासून झालेली नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला समिती निवडीचा विसर तर पडला नाही ना? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
गावातील तंटे गावातच मिटावे न्यायालयापर्यंत जाण्याची पाळी नागरिकांवर येऊ नये, यासाठी तत्कालिन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पुढाकारातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती योजना अमलात आली. गावागावात तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आली. तंटामुक्त समित्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी बक्षिसरुपी देणगीही देण्याचे ठरविण्यात आले. कित्येक गावांनी उल्लेखनीय कार्य करून बक्षीस पटकाविले. तंटामुक्त समित्यांना राजकीय गंध लागू नये, यासाठी विविध क्षेत्रातील आणि त्या-त्या क्षेत्रात पारंगत असलेल्या लोकांचा समावेश व्हावा, जेणेकरुन न्याय निवाडा निष्पक्षपाती होईल हा त्या मागचा उद्देश होता. सुरुवातीला या निकषाचे पालनही झाले अन् आता या तंटामुक्त समितीत राजकारण शिरले आहे.
दरवर्षी १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनी तंटामुक्त समिती सदस्यांची निवड केली जाते. प्रत्येक गावात दरवर्षी तंटामुक्त समिती अथवा अध्यक्षाची निवड करण्याची अथवा फेरनिवड करण्याची प्रथा आहे. परंतु नवरगाव हे अपवाद ठरले आहे. मागील दोन वर्षांपासून येथे तमुंस अध्यक्षाची निवड झालेली नाही.
तंटामुक्त समित्यांची स्थापना झाली तेव्हापासून प्रत्येक तालुक्यातील ७० ते ८० गावांना तंटामुक्त गाव समितीचा पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार रकमेचा वापर गाव विकासासाठी झाला. परंतु नवरगाव अजूनही पुरस्कारापासून वंचित आहे. याला येथील तंटामुक्त समितीची निष्क्रियता म्हणायची की, नियोजन शुन्यता हे न समजन्याच्या पलिकडेच आहे.
तंटामुक्त समितीची निवड अजूनही झाली नसताना पोलीस पाटलाची निवड का करण्यात आली नाही, असा हेही एक कोडेच आहे. समिती निवडीचा विसर पडलेल्या ग्राम पंचायत प्रशासनाने ग्रामसभा घेऊन तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करावी अशी मागणी गावतील नागरिक करीत आहे. समिती अभावी गावात अनेकदा तंटे निर्माण होत असतात. (वार्ताहर)