जलयुक्तच्या कामाने अडेगावातील नाल्याला आले नदीचे स्वरुप
By Admin | Updated: August 1, 2016 00:33 IST2016-08-01T00:33:46+5:302016-08-01T00:33:46+5:30
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात शेकडो कामे अभियानांअतर्गत करण्यात आले.

जलयुक्तच्या कामाने अडेगावातील नाल्याला आले नदीचे स्वरुप
सलग तीन बंधारे : शेतकऱ्यांना फायदा, ९० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली
चंद्रपूर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात शेकडो कामे अभियानांअतर्गत करण्यात आले. नवीन बंधाऱ्यासह नाल्यावरील जुन्या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने या नाल्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अडेगाव शिवारात एका नाल्यावर सलग ३ बंधारे घेऊन खोलीकरण करण्यात आल्याने हा नाला नदीत रुपांतरीत झाला आहे. परिसरातील शंभर शेतकऱ्यांना ९० हेक्टरला या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे.
जिल्ह्यात नवीन सिमेंट नाला बंधाऱ्यासह जुन्या बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण, शेततळे, बोडी नुतनीकरण यासारखी अनेक कामे जलयुक्त शिवार अभियानात घेण्यात आली आहे. यावर्षी अभियानाच्या दुसऱ्या वर्षातही विविध कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावच्या शिवारात असलेल्या नाल्यावर काही वषार्पूर्वी तीन सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले होते. दरम्यानच्या काळात गाळ मोठ्या प्रमाणावर साचल्याने या बंधाऱ्यात थोडे पाणी साचून उर्वरीत पाणी निघून जात होते. तसेच गाळाने भरलेल्या या बंधाऱ्याचा लगतच्या शेतकऱ्यांनाही फायदा होत नव्हता.
गेल्या वर्षी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी या नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. सलग तीन बंधाऱ्याची एकूण लांबी १५०० मिटर इतकी आहे. या सर्व भागाचे खोलीकरण करण्यात आले. पूर्ण लांबीची खोली आता सरासरी तीन मिटर इतकी आहे. जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच पावसात तीनही बंधारे तुंडूंब भरुन वाहू लागले आहे. रुंदीकरणामुळे तसेच पाणी भरल्याने हा नाला आता नदीत रुपांतरीत झाला आहे.
पूर्वी सिंचनाची सोय नसल्याने किंवा उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना केवळ एकाच पिकावर समाधान मानावे लागत होते. खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नसल्यास हे पीकही हातचे जायचे. बंधाऱ्यामुळे खरीपाचे पीक चांगल्या पध्दतीने घेण्यासोबतच दुसरे व तिसरे पिकही शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या बंधाऱ्यामुळे आमच्या उत्पनात वाढ होण्यासोबतच एकापेक्षा जास्त पिके आम्हाला घेता येईल, अशी प्रतिक्रिया बंधारा शिवारातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
प्रत्येक बंधाऱ्यात
४५ टीसीएम पाणी साठा
कृषी विभागाच्या सलग खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले असून या कामावर २० लक्ष रुपये खर्च करण्यात आले. नाल्याच्या लगत व परिसरातील १०० शेतकऱ्यांना बंधाऱ्याचा सिंचनासाठी फायदा होणार आहे. तर जवळपास ९० हेक्टर जमिनी सिंचनाखाली येतील. एका बंधाऱ्यात १५ या प्रमाणे तीन बंधाऱ्यात ४५ टीसीएम इतका पाणी साठा झाला आहे.