चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावर साकारतेयं राष्ट्रीय उद्यान
By Admin | Updated: August 6, 2016 00:40 IST2016-08-06T00:40:55+5:302016-08-06T00:40:55+5:30
५० एकर विस्तृत जागेवर आणि चंद्रपूर- बल्लारपूर या महामार्गावर राष्ट्रीय उद्यान आकार घेत असून त्याचे काम जलदगतीने सुरु आहे. कामाची गती बघता,...

चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावर साकारतेयं राष्ट्रीय उद्यान
वसंत खेडेकर बल्लारपूर
५० एकर विस्तृत जागेवर आणि चंद्रपूर- बल्लारपूर या महामार्गावर राष्ट्रीय उद्यान आकार घेत असून त्याचे काम जलदगतीने सुरु आहे. कामाची गती बघता, हे उद्यान महिना- दीड महिन्यात जनतेकरिता खुले होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने हे उद्यान आकारास येत असून या उद्यानाला देशाचे माजी राष्ट्रपती स्व. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात येणार आहे. उद्यानाच्या मध्यभागी स्व. कलाम यांचा १५ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसविला जाणार आहे. या उद्यानात वन तलाव, लक्ष्मण झुला, मचान, बालोद्यान, या बोलोद्यानात बालकांना खेळण्याकरिता विविध वस्तू आदी राहणार आहे. तद्वतच उद्यानाचा समस्त परिसर पाम, फूल व फळ झाड, शोभिवंत अशा वृक्ष वेलींनी बहरणार आहे. हिरव्या श्रीमंतीसह देखण्या वस्तूंनी हे उद्यान श्रृंगारणार आहे. उद्यानात फेरफटका मारण्याकरिता वळणदार पायवाटा व त्यांच्या कडेला मेहंदीची झाडे लावली जात आहेत. वन तळ्याचा आकार इंग्रजी एस प्रमाणे असून त्यात छोट्या बोटी चालतील. या उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर प्रेरणादायी प्रसंग रंगविले जाणार आहेत. या उद्यानाचे काम वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
चंद्रपूरपासून बल्लारपूरला जाणारा मार्ग बरेच वर्षे उपेक्षितच राहिला. या रोडच्या दर्जाकडे चंद्रपूर प्रशासनाने फारसे लक्ष दिले नाही. या मार्गावर राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाल्यानंतर चंद्रपूर शहर ते महामार्गाला अप्रोच होणाऱ्या रोडची स्थिती सुधारली आहे. या दोन अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे, पुढे भिवकुंड नाल्याजवळील सन्मित्र सैनिकी विद्यालयामुळे या रोडचे महत्त्व वाढले. आता स्व. कलाम यांच्या स्मृतीत होत असलेल्या या विस्तृत उद्यानाने या महत्त्वात भर पडणार आहे. या बायपास मार्गावर चंद्रपूर मेडीकल कॉलेज बांधण्याचे ठरले असून त्यानंतर या रोडला आणखी महत्त्व येणार आहे. चंद्रपूर- बल्लारपूर भागात सहल स्थळ नाही, ही उणीव या उद्यानाने भरुन निघणार आहे.