स्वच्छतेचा मोदीमंत्र गडचांदुरात पोहोचलाच नाही
By Admin | Updated: November 11, 2014 22:38 IST2014-11-11T22:38:32+5:302014-11-11T22:38:32+5:30
सिमेंटचे शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात परप्रांतीयांचे वास्तव्य असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी येथे नगर

स्वच्छतेचा मोदीमंत्र गडचांदुरात पोहोचलाच नाही
गडचांदूर : सिमेंटचे शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात परप्रांतीयांचे वास्तव्य असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी येथे नगर परिषद स्थापन झाली. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वच्छेचा मंत्र दिला. मात्र, नागरिकांची घोर निराशाच झाली आहे. प्रत्येक वॉर्ड समस्याग्रस्त असून त्यांचा मंत्र पोहचलाच नाही, असेच दिसत आहे.
गडचांदूर शहराच्या सभोवताल अल्ट्राटेक, माणिकगड, मुरली अॅग्रो व अंबुजा असे चार सिमेंट कारखाने आहेत. गडचांदूरचे महत्व वाढण्यास कारखान्यांचा महत्वाचा वाटा आहे. विविध प्रांतातील लोक इथे रोजगाराच्या दृष्टीने वास्तव्यास आहेत. पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे येथील समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आही.
गडचांदुरातील येथील नागरिक कधीच संघटीत होऊन कोणत्याही समस्यांविषयी आवाज उठवित नाही. शहरात खुप मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, रस्त्याने चालताना किंवा दुचाकीने फिरताना फार धुळीचा सामना करावा लागतो. मुख्य रस्त्याने सुसाट वेगाने वाहने धावतात, चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशा अनेक समस्या कित्येक वर्षांपासून गडचांदुरवासीयांसमोर आ वासून उभ्या आहेत. मात्र यावर उपाययोजना करण्याकरिता कोणताही अधिकारी पाऊले उचलताना दिसत नाही.
शहरात ट्रान्सपोर्टचे व्यवसाय असून पोलीस ठाण्याला अगदी लागून आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रिघ लागलेली असते. एकाही ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपले ट्रक उभे करण्याची नीट व्यवस्था केलेली नाही. पण हे व्यावसायीक पैशाचा वापर ट्रक उभे करण्याची व्यवस्था करण्याऐवजी पोलिसांचे तोंड बंद करण्याकरिता करतात. त्यामुळे सर्वच ट्रान्सपोर्ट व्यावसायीक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात.
एवढेच नाही तर धुळीमुळे तर या रस्त्यांची वाट लागली आहे. दुचाकीस्वारानी वाहन चालवावे कसे? असा प्रश्न या रस्त्याने पडतो. माणिकगड सिमेंट कंपनीने काही दिवस धूळ न उडावी यासाठी पाणी मारण्याचे ढोंग केले. मात्र अल्पावधीतच हा उपक्रम गुंडाळला. त्यामुळे या रस्त्याने किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. मात्र सामान्य माणूस इथे होरपळला जात आहे.
माणिकगड कंपनीच्या प्रवेशद्वारापासून ते लखमापूर फाट्यापर्यंत जिथं तिथं वाहनं उभी राहतात. याच मार्गावरून शाळेचे विद्यार्थी, दुचाकी चालक, कंपनीचे मजूर वर्दळ करीत असतात. या ट्रकांमुळे याठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. पण ते रोखण्यासाठी आजपर्यत कोणीच पाऊले उचललेली नाहीत. नवीन ठाणेदार आले की चार दिवस आपला दरारा दाखवितात व नंतर जैसे थे ! हीच परिस्थिती आजपर्यंत गडचांदूरवासीयांनी अनुभवली आहे. परिसरात वाहनांमध्ये केरोसीनचा सर्रास वापर होते. अवैध वाहतूक सुद्धा जोमात चालते. भंगार चोरही मोठ्या प्रमाणात आहेत. शहरात भंगारचे व्यवसाय थाटात चालते. (शहर प्रतिनिधी)