नंदोरीचा पारंपरिक पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 01:00 IST2016-09-02T01:00:13+5:302016-09-02T01:00:13+5:30
‘कासऱ्यानं मारलं, तुत्यानं मारलं, राग नोको मानू, जेवाले ये..’ अशी आर्त साद घालत पोळ्याच्या आदल्या म्हणजेच वाटबैलाच्या ....

नंदोरीचा पारंपरिक पोळा
पारंपारिक पोळा : नंदोरीत बैलावर नाचले ‘देव’
राग नोको मानू, जेवाले ये...!
चंद्रपूर : ‘कासऱ्यानं मारलं, तुत्यानं मारलं, राग नोको मानू, जेवाले ये..’ अशी आर्त साद घालत पोळ्याच्या आदल्या म्हणजेच वाटबैलाच्या सायंकाळी खांदे शेकून बैलांना दिलेले निमंत्रण आणि त्यानंतर पोळ्यात बैलजोडींची पूजा करून बैलांना पे्रमाचा घास भरवित जिल्हाभर पोळ्याचा सण साजरा झाला.
सायंकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने गावागावात पोळा भरविण्यात आला. पोलिसांनी पोळ्याच्या पार्श्वभूमीवर ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. शेतीवरील संकट आणि महागाईचा परिणाम यंदाच्या पोळा सणावरही जाणवला. पूर्वीच्या काळी शेकडोंच्या संख्येने असणाऱ्या पोळयातील बैलजोड्यांची संख्या यंदा मात्र खालावलेली दिसली. असे असले तरी काळया आईचे खरे सेवक असलेल्या शेतकऱ्यांनी पोळाच्या सणात बैलांच्या पुजनात आणि त्यांना सजविण्यात कसलीही कसर ठेवली नव्हती. बेगड, कागदी फुले, बिलोरी आरसे, चवर, नवे कासरे, रंगविलेल्या शिंगोट्या, गेरूचा रंग अशा कितीतरी पद्धतीने बैलांना सजवून शेतकऱ्यांनी बैलजोड्या पोळात उतरविल्या होत्या. (जिल्हा प्रतिनिधी)
नंदोरीचा पारंपारिक पोळा
नंदोरी : भद्रावती-वरोरा तालुक्याच्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेला नंदोरीतील पोळा पारंपारिक पद्धतीने गुरूवारी पार पडला. वर्धा नदीच्या धारेतून आणलेल्या पाण्याचे कमंडलू धारण केलेल्या गुढीधारी ग्रामस्थांनी परंपरागत गुढ्या उभारल्या. अंगामध्ये वारे भरलेले ‘देव’ परंपरागत पद्धतीने बैलांच्या पाठीवरून नाचले. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या नंदोरी येथील पोळा सणाला महत्व आहे. नागदेवतांची ठाणी असलेल्या या गावाच्या पौराणिक महत्वानुसार यंदाचाही पोळा तेवढ्याच परंपरेने पार पडला. मोठे हनुमान मंदीर, लहान हनुमान मंदीर, आखर या ठिकाणी हा परंपरागत पोळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पोळ्यात झडलेल्या झडत्या आणि गणांनी यात विशेष रंग भरला होता.(वार्ताहर)