नांदा येथे नऊ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर

By Admin | Updated: May 21, 2017 00:36 IST2017-05-21T00:36:22+5:302017-05-21T00:36:22+5:30

कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा गावासाठी जलस्वराज्य टप्पा-२ योजनेअंतर्गत नऊ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.

Nanda's water supply scheme approved in Nanda | नांदा येथे नऊ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर

नांदा येथे नऊ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर

जलस्वराज्य टप्पा-२ : ग्रामसभेमध्ये दिली माहिती
रत्नाकर चटप । लोकमत न्यूज नेटवर्क
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा गावासाठी जलस्वराज्य टप्पा-२ योजनेअंतर्गत नऊ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
सदर पाणीपुरवठा योजनेमुळे मागील अनेक वर्षांपासून गावात असलेल्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. सदर पाणीपुरवठा नजिकच्या अमलनाला धरणातून करण्यात येणार आहे. यामध्ये गावात पाईपलाईनद्वारे प्रत्येक कुटुंबाला मुबलक पाणी मिळणार असून डिजिटल मीटर बसविण्यात येणार आहे. नांदाफाटा येथे पाणी शुद्धीकरण केंद्र व नियंत्रण केंद्र बांधण्यात येत आहे. सद्यस्थितीत ११ हजार लोकसंख्येच्या आधारावर मंजूर झालेल्या या योजनेची क्षमता भविष्यासाठी १७ हजार लोकसंख्येचे उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आली आहे. दिवसेंदिवस अल्ट्राटेक सिमेंट उद्योगामुळे व शेजारच्या अंबुजा व माणिकगड सिमेंट उद्योगामुळे नांदाफाटा मिनी शटर म्हणून नावरूपास येत आहे. लोकसंख्या वाढत असून पाण्याची समस्याही बिकट होत चालली आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असुन शासनामार्फत जलस्वराज्य टप्पा-२ करिता नांदा गावाची निवड करण्यात आली आहे. सध्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावात २० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या टाकीतून पाणी पुरवठा सुरू आहे. सदर टाकीची क्षमता केवळ ३० हजार लिटर इतकीच आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा होत नाही. मात्र या योजने मुळे ही समस्या मार्गी लागणार आहे.

गावकऱ्यांची पाण्याची समस्या सुटणार
जलस्वराज्य टप्पा-२ योजनेच्या मंजुरीमुळे गावाला मोठा पाणीपुरवठा होणार असून पाण्याची समस्या कायम मिटणार आहे. त्याचबरोबर नांदाफाटा येथील पिंपळगाव मार्गावर बांधण्यात आलेल्या टाकीचा वापरही या योजनेत करण्यात येणार आहे. फुटलेली कमकुवत पाईपलाईनही दुरूस्ती करून पाणीपुरवठा नियमीत केल्या जाणार आहे. योजनेच्या मंजुरीमुळे गावचे सरपंच घागरू कोटनाके, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्रामविस्तार अधिकारी मसराम तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले असुन लवकरच काम सुरू होणार असल्याने आनंद व्यक्त केल्या जात आहे.

Web Title: Nanda's water supply scheme approved in Nanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.