सातबारावरून नावे केली गहाळ
By Admin | Updated: July 1, 2015 01:27 IST2015-07-01T01:27:37+5:302015-07-01T01:27:37+5:30
नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील ईश्वर डोमाजी रंदये यांच्या नावे

सातबारावरून नावे केली गहाळ
मोहाळी (नलेश्वर) : नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील ईश्वर डोमाजी रंदये यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारावरून कोणत्याही प्रकारची वाटणी व संमतीपत्र न घेता इतर हिस्सेदारांनी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून नावे गायब केली.
मंडळ अधिकरी व तलाठ्याच्या या प्रतापाने ईश्वर रंदये या शेतकऱ्याला वडिलोपार्जित व हक्काच्या शेतजमिनीपासून वंचित राहावे लागत आहे. २५ वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या वाऱ्या करून व पायऱ्या झिजवून ईश्वर रंदये याला अद्यापही न्याय मिळाला नाही.
सोनापूर प.ह.नं. १८ गोविंदपूर येथील जुना गट नं. १४८/१ आराजी ५.६७ हेक्टर आर. भोगवट वर्ग २ ची धानारी शेतजमीन अन्यायग्रस्त शेतकरी ईश्वर डोमाजी रंदये व इतर हिस्सेदार कैलाश नामदेव रंदये, विलास नामदेव रंदये व विठोबा रामदास रंदये या सर्वांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. २५ वर्षापूर्वी इतर हिस्सेदारांनी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून ईश्वर रंदये यांचे नाव सातबारावरून केले.
वास्तविक नविन सातबारा फेरफार करताना संबंधित हिस्सेदाराचे संमतीपत्र व वाटणीपत्र आवश्यक आहे. असे असताना ईतर हिस्सेदारांनी २५ वर्षापूर्वी मंडळ अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून हा गैरव्यवहार केला.
मंडळ अधिकारी व तलाठ्याच्या या प्रतापाने ेईश्वर रंदये या शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या साडेतीन एकर शेतजमिनीपासून वंचित राहावे लागत आहे.
ही शेतजमीन मिळावी म्हणून हा अन्यायग्रस्त शेतकरी २५ वर्षांपासून सातत्याने तहसील कार्यालयाच्या वाऱ्या करून व पायऱ्या झिजवूनही त्याला न्याय मिळत नाही. न्याय मिळावा व हक्काची शेतजमीन मिळावी म्हणून त्याचा संघर्ष सुरूच आहे. (वार्ताहर)
सर्व नियम धाब्यावर
सातबारावरील नाव कमी करण्यासाठी व फेरफार करण्यासाठी वारसांंकडून किंवा संबंधितांकडून संमतीपत्र मिळत नाही, तोपर्यंत महसूल विभागाला सातबारावरून कोणाचेही नावे कमी करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. सातबारावरून नावे कमी करण्याचा अधिकार मागणीनुसार संबंधिताचे संमतीपत्र किंवा मृत्युपश्चात सरपंचाचे वारसान प्रमाणपत्र, पोलीस पाटलाचे वारसान प्रमाणपत्र, ग्रामपंचायत कार्यालयातील सचिवाची स्वाक्षरी असलेला मृत्यू दाखला व १०० रुपयाच्या शपथपत्रावर वारसा हक्क असल्याचे सिद्ध करावे लागते. यानंतरही महसूल विभागाला त्या संदर्भात कुणाची हरकत किंवा आक्षेप असल्यास मुदतपूर्व जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागतो. ठरलेल्या मुदतीत कुणाचे आक्षेप किंवा हरकत नसल्यास सातबारावर वारसानाचे नावे चढवून सातबारा फेरफार करण्यात येत असतो. मात्र येथे २५ वर्षापूर्वी मंडळ अधिकारी व तलाठ्याने सर्व नियम धाब्यावर बसवून अन्यायग्रस्त शेतकऱ्याचे नाव गहाळ केल्याचा प्रताप केलेला आहे.
शेतजमीन विकली
इतर हिस्सेदार कैलास नामदेव रंदये, विलास नामदेव रंदये, विठोबा सोमा रंदये यांनी अन्यायग्रस्त शेतकरी इश्वर डोमा रंदये यांची शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संगनमताने नाव गायब केली व तीच शेतजमीन नविन गट नं. १४८/२ शंकर गणपत भरडे रा. सोनापूर व नवीन गट नं. १४८/४ राधाबाई विनायक नन्नावरे यांना परस्पर विकून नवीन सातबारा तयार केल्याचा आरोप अन्यायग्रस्त शेतकरी ईश्वर रंदये यांनी केला असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची पूर्णत: चौकशी करून न्याय देण्याची मागणी केलेली आहे.