दुधासाठी नागपूर, वर्धा गोंदियावर अवलंबून
By Admin | Updated: June 21, 2017 00:40 IST2017-06-21T00:40:16+5:302017-06-21T00:40:16+5:30
या जिल्ह्यात दररोज ४५ हजार लिटर दुधाची गरज आहे. त्याच वेळी उत्पादन मात्र केवळ ८ हजार ५०० लिटर होत असते.

दुधासाठी नागपूर, वर्धा गोंदियावर अवलंबून
४५ हजार लिटर दुधाची गरज : खासगी कंपन्यांचे वर्चस्व
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : या जिल्ह्यात दररोज ४५ हजार लिटर दुधाची गरज आहे. त्याच वेळी उत्पादन मात्र केवळ ८ हजार ५०० लिटर होत असते. परिणामी दुधाच्या बाजारपेठेतील बहुसंख्य भाग खासगी कंपन्यांनी व्यापला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा आदी जिल्ह्यांमधील दूध दररोज सकाळी येत आहे.
राज्याच्या दुग्धविकास विभागाने शेतकऱ्यांच्या दूध खरेदीवर तीन रुपयांची वाढ केली आहे. त्याचा आर्थिक भार ग्राहकांवर टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना जुन्याच दराने दूध मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दुग्धविकास खात्याच्या नवीन निर्णयाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात सध्या नागभीड आणि ब्रह्मपुरी या दोन तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत असते. सध्या शासकीय योजनेच्या ३७ वितरकांना एजन्सी देण्यात आल्या आहेत. या एजन्सी दूध वितरण करीत आहेत.
चंद्रपूर येथील शासकीय दूध योजनेत २० जून रोजी ७ हजार ६०० लिटर दूध आले. त्या सर्व दुधाचे वितरण जिल्ह्यात करण्यात आले आहे. जिल्ह्यात नागभीड येथे दूध थंड करण्याचे संयत्र सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथेही असेच संयत्र सुरू आहे. उमरेडमधील दूध नागभीड येथे येते. दोन्ही ठिकाणचे दूध चंद्रपूरला पाठविण्यात येते. नागभीड व उमरेड येथील मिळून ३ हजार ७५५ लिटर दूध चंद्रपूरच्या शासकीय दूध योजनेत येत आहे. याशिवाय वर्धा येथून २ हजार २५७ लिटर आणि गोंदिया जिल्ह्यातील कोमारा येथून २ हजार ५४० लिटर असे एकत्रित ८ हजार ५५२ लिटर शासकीय दुधाचे जिल्ह्यात वितरण करण्यात येते. या सर्व शासकीय योजनेला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वाढीव दराचा लाभ मिळणार आहे.
केवळ आठ दूध संघ जिवंत
चंद्रपूर जिल्ह्यात २४७ सहकारी दूध संघ स्थापन झाले आहेत. मात्र, त्यापैकी अनेक दूध संघ अवसानात गेले किंवा वादामध्ये बंद पडले. चंद्रपूरच्या शासकीय दूध योजनेची स्थापना १९७९मध्ये झाली होती. सध्या केवळ आठ संस्था सुरू आहेत. त्यापैकी नागभीड तालुक्यातील पाच आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील तीन सहकारी संस्था आहेत.
खासगी कंपन्यांचे ३५ हजार लिटर दूध
जिल्ह्यात सर्वाधिक दूध खासगी कंपन्यांचे विकले जाते. शासकीय दूध योजनेत दूध संकलन कमी प्रमाणात होते. मागणीपेक्षा दूध उत्पादन कमी असल्याने पुरवठादेखील त्याच प्रमाणात होत आहे. नागपूर येथील दिनशॉ, महानंदा, हल्दीराम, भंडारा येथील किसान, पूर्णा-पवनी, क्रीमलाईन जर्सी, गोवर्धन आदी कंपन्या तब्बल ३५ हजार लिटर दुधाचा पुरवठा करीत आहेत.
तीन प्रक्रिया केंदे्र बंद
चंद्रपूर जिल्ह्यात खडसंगी येथे चिलिंग सेंटर होते. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली व कनेरी येथेही असेच केंद्र होते. परंतु शासकीय दूध योजनेसाठी दूध संकलन कमी होत गेल्याने या तिन्ही केंद्रांना दूध पुरवठा अत्यल्प होत होता. दुधाची वाहतूक करणे परवडत नसल्याने हे तिन्ही केंद्र बंद पडले आहेत.
शासनाने न परवडणारे मार्ग बंद करण्यास सांगितले आहे. जिल्ह्यातील वातावरणात दुसऱ्या राज्यातील गाई टिकाव धरत नाहीत. त्यांचे दूध कमी आले आहे. अनेकांनी बाहेरून गायी आणून दूध उत्पादन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. यांत्रिक शेतीमुळे दुधाळ जनावरे कमी झाली आहेत. त्याचाही परिणाम शासकीय दूध संकलनावर झाला आहे.
- डी. के. काळे,
प्रभारी दुग्ध विकास
अधिकारी, चंद्रपूर.