नरेगाच्या बिलाचा चिमूर ते नागभीड प्रवास
By Admin | Updated: August 10, 2014 22:54 IST2014-08-10T22:54:34+5:302014-08-10T22:54:34+5:30
चिमूर पंचायत समितीमधील नरेगाच्या लेखापालाची डिजीटल सही हरविल्याने अनेक महिन्यापासून मजूरांचे वेतन व शेतकरी विंधन विहीरी व शेततळ्याच्या लाभापासून वंचित झाले आहेत.

नरेगाच्या बिलाचा चिमूर ते नागभीड प्रवास
राजकुमार चुनारकर - खडसंगी
चिमूर पंचायत समितीमधील नरेगाच्या लेखापालाची डिजीटल सही हरविल्याने अनेक महिन्यापासून मजूरांचे वेतन व शेतकरी विंधन विहीरी व शेततळ्याच्या लाभापासून वंचित झाले आहेत. मात्र मजुरांना वेतन मिळावे म्हणून येथील कंत्राटी कर्मचारी मजूराच्या वेतनाचे बिल नागभीड येथील पंचायत समितीच्या लेखापालाकडे न्यावे लागत आहे. त्यामुळे चिमूर पंचायत समितीमध्ये नरेगाच्या बिलाचा चिमूर ते नागभीड असा प्रवास सुरू झाला आहे.
शासनाने मजुरांना गावातच काम मिळावे म्हणून नरेगा योजना कार्यान्वित केली व या योजनेमुळे अनेक बेरोजगारांना गावातच रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. सुरुवातीच्या काळात या नरेगा योजनेमध्ये अनेक प्रकारच्या गैरव्यवहाराच्या तक्रारी जनतेकडून करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत शासनाने नरेगा योजना पूर्ण पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही प्रमाणात यशही आले आहे. नरेगाच्या मजुरांना कुणाच्या मागे न धावता कामाचे वेतन सरळ त्यांच्या खात्यात जमा होऊ लागल्याने या योजनेकडे ग्रामीण मजुरांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे.
रोजगार हमी योजनेमधील गैरप्रकार दूर व्हावे म्हणून शासनाकडून ही योजना गावातील ग्रामसेवक, रोजगारसेवक यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या योजनेत मजुरांची नोंदणी, जॉब कार्ड व मजुरांना दिले जाणारे वेतन हे मजुरांच्या बँक किंवा पोष्ट खात्यात जमा करण्यात येते. या योजनेतील मजुरांचा पगार साप्ताहिक देण्यात यावा, असे शासनाचे बंधन आहे. मात्र चिमूर पंचायत समितीमध्ये कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईने नरेगाच्या ८६१ मस्टरवरील मजुरांचे वेतन थकीत आहे.
मजुरांचे वेतन थकण्यासाठी प्रशासनाकडून अनेक कारणे सांगण्यात येत आहेत. त्यापैकी इंटरनेट सेवा नसणे, कामाची एम.बी. वेळेवर न येणे अशी कारणे पुढे करण्यात येत आहे. मात्र एवढे करुनही लेखा विभागात गेलेल्या बिलावर लेखापालाची डिजीटल सही दोन महिन्यांपासून हरविल्याने चिमूर पंचायत समिती अंतर्गत नरेगाच्या मजुरांचे वेतन थकीत पडले आहे.
चिमूर पं.स. मधील नरेगाचे लेखापाल या वेतनासाठी निष्प्रभ ठरत असल्याने मजुरांचे वेतन व शेतकऱ्यांचे अनुदान मिळावे, याकरिता येथील कंत्राटी कर्मचारी नरेगाच्या बिलाचा गठ्ठा घेऊन नागभीड पंचायत समितीच्या लेखापालाची डिजीटल सहीसाठी नेत आहे. मात्र नागभीड येथील लेखापाल आपल्याकडे आधीच काम जास्त आहे त्यात आणखी ही भर म्हणून नेमके योग्य असलेल्या बिलावरच सही करतात तर अनेक बिलावर त्रुटी असल्याच्या कारणाने परत करतात. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मजुरांच्या वेतनाचे बिल चिमूर ते नागभीड ने-आण करावे लागत आहे. चिमूर पं.स. मधील नरेगाच्या लेखापालाची डिजीटल सही मुंबईवरुन येईपर्यंत चिमूर पंचायत समितीमधील नरेगाच्या मजुरांच्या बिलाचा चिमूर ते नागभीड असा प्रवास करावा लागणार आहे. तर नागभीडचे लेखापाल किती देयके मंजूर करतात, याकडे चिमूर परिसरातील नरेगा मजुरांचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.