नागभीड नगरपालिका झाली पाच वर्षांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:57+5:302021-04-12T04:25:57+5:30
नागभीड : ११ एप्रिल २०२१ रोजी नागभीड नगर परिषद पाच वर्षांची झाली आहे. या पाच वर्षांत नागभीड नगर परिषदेचा ...

नागभीड नगरपालिका झाली पाच वर्षांची
नागभीड : ११ एप्रिल २०२१ रोजी नागभीड नगर परिषद पाच वर्षांची झाली आहे. या पाच वर्षांत नागभीड नगर परिषदेचा फार विकास झाला नसला तरी नगर परिषदेने नागभीडच्या विकासाची मुहूर्तमेढ नक्कीच रोवली, असे निश्चित म्हणता येईल.
नागभीड नगर परिषदेची स्थापना ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. अनेक ग्रामपंचायती व खेड्यांनी मिळून ही नगर परिषद बनविण्यात आली आहे. सभोवतालच्या नवखळा, डोंगरगाव, बाह्मणी, तुकूम, भिकेश्वर, चिखलपरसोडी, सुलेझरी, बोथली आदी विविध ग्रामपंचायती मिळून ही नगर परिषद बनविण्यात आली आहे. या नगर परिषदेचे स्थापनेनंतरचे पहिले एक वर्ष प्रशासकांनी कामकाज पाहिले. त्यानंतर २३ मे २०१७ रोजी या नगर परिषदेच्या कार्यकारी मंडळाची निवड झाली. आज नागभीड शहरात जो थोडाकाही बदल जाणवत आहे, तो नगर परिषद स्थापन झाल्यानंतरचा आहे. गेल्या चार वर्षांत नागभीड व नागभीड नगर परिषद क्षेत्रासाठी अनेक योजना कार्यान्वित झाल्या आहेत.
बॉक्स
ही कामे झाली पूर्ण
३०.१३ कोटी रुपये किमतीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ५१३ लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. नागभीड न.प. क्षेत्रातील स्मशानभूमीच्या विकासासाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले असून, या स्मशानभूमीच्या विकासाची कामे सुरू आहेत. नागभीड न.प.ने स्वमालकीच्या घंटागाड्या खरेदी करून या घंटागाड्यांद्वारे घरोघरी कचरा संकलन सुरू केले आहे. ४ कोटी रुपयांतून प्रशस्त क्रीडा संकुलाची निर्मिती होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा पथदिव्यांची उभारणी याच काळात झाली आहे. अद्ययावत स्विमिंग पूल उभारणीचे काम सुरू आहे. नगर परिषद क्षेत्रात सौरऊर्जा पंप सुरू करण्यात आले आहेत. ३ कोटी रुपयांच्या निधीतून आठवडी बाजाराचे नूतनीकरण काम करण्यात आले आहे. इमारतीची गरज लक्षात घेऊन नगर परिषद कार्यालयासाठी अद्ययावत इमारत तयार करण्यात आली आहे. यासारखी आणखी बरीच कामे आहेत आणि ही कामे नागभीडसाठी नक्कीच भूषणावह आहेत.
कोट
नागभीड नगर परिषद खेड्यांची मिळून बनली आहे. नगर परिषदेच्या हिशेबाने नागभीडसह या खेड्यांचाही विकास साधण्याचे काम सुरू आहे. नागभीड नगर परिषदेच्या विकासासाठी आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांचे जे सहकार्य मिळत आहे, ते बहुमोल आहे.
-गणेश तर्वेकर, उपाध्यक्ष, नागभीड नगर परिषद