नागभीडमध्ये ७२४ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:20+5:302021-01-08T05:35:20+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासाठी ...

नागभीडमध्ये ७२४ उमेदवार रिंगणात
घनश्याम नवघडे
नागभीड : तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासाठी ७२४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर बॅनर, पोस्टरने राजकीय वातावरण तापायला लागले आहे.
नागभीड तालुक्यातील या ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीनुसार ६६ हजार २७२ मतदार आहेत. नागभीड तालुक्यात पूर्वी ६५ ग्रामपंचायती होत्या. यातील नऊ ग्रामपंचायतींचा समावेश नागभीड नगर परिषदेत करण्यात आल्याने आता तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या. आता ४३ ग्रामंचायतींच्या निवडणुका होणार आहे. मात्र, यातील दोन ग्रामपंचायतींची निवड बिनविरोध झाली. आता प्रत्यक्षात ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी ७८४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६० उमेदवारांनी नामांकन परत घेतल्याने ७२४ उमेदवार रिंगणात आहेत.
बाॅक्स
६१ उमेदवार बिनविरोध
यावेळी ४३ ग्रामपंचायतींच्या ३६३ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, दोन ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाल्याने आणि अन्य ग्रामपंचायतींचे ४५ सदस्य बिनविरोध निवडून आल्याने आता प्रत्यक्षात ३०२ सदस्यांसाठीच निवडणूक होणार आहे.
उमेदवारांचा प्रचार सोशल मीडियावर
सोमवारी निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी लगेच सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा सुरू केला आहे. यात व्हाॅट्सॲप, फेसबुक, आदी माध्यमांचा समावेश आहे. या माध्यमांद्वारे प्रचार सुरू आहे.
बाॅ्स
तळोधी, वाढोणा, सावरगाव लक्षवेधक
तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्या तरी तळोधी, वाढोणा, सावरगाव या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तळोधी ग्रामपंचायत १७ सदस्यीय, वाढोणा १३ सदस्यीय, तर सावरगाव ११ सदस्यीय ग्रामपंचायत आहे.