गुलाल काँग्रेसचाच, भाजप जैसे थे, शिवसेना व गोंगपाची मुसंडी, राकाँची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 18:31 IST2022-01-19T18:18:25+5:302022-01-19T18:31:34+5:30
काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी ६ जागा जादाच्या बळकावीत तब्बल ५३ जागा काबीज करीत जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा पक्ष असल्याचे निर्विवादपणे सिद्ध केले आहे.

गुलाल काँग्रेसचाच, भाजप जैसे थे, शिवसेना व गोंगपाची मुसंडी, राकाँची घसरण
चंद्रपूर : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचे सर्व १०२ जागांचे निकाल बुधवारी हाती आले. काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी ६ जागा जादाच्या बळकावीत तब्बल ५३ जागा काबीज करीत जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा पक्ष असल्याचे निर्विवादपणे सिद्ध केले आहे.
यापाठोपाठ भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा सहा जागांचा फटका बसला असून, यावेळी २४ जागांवर विजय संपादन करून दुसरा मोठा पक्ष असल्याचे स्थान कायम राखले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८ जागांसह तिसऱ्या स्थानावर असला तरी यापूर्वीच्या तुलनेत ३ जागा गमावल्या आहेत. शिवसेनेने ५ जागांची कमाई करीत सहा जागांवर विजय संपादन केला आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीने पहिल्यांदाच ५ जागांसह आपले दमदार खाते उघडले आहे. बहुजन वंचित आघाडीनेही २ जागांसह आपले खाते उघडले आहे. बसपाने भाेपळाही फोडला नाही. शेतकरी संघटनेने १ जागा जिंकून आपले अस्तित्व कायम राखले आहे. अपक्षांनी केवळ ३ जागांवर विजय मिळविला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ८ जागांचा फटका बसला आहे.
सिंदेवाही, सावली व कोरपना नगरपंचायतीवर काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केले आहे, तर गोंडपिपरी काँग्रेस ७ जागांसह सत्तेच्या जवळ आहे. जिवतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होती. या दोन्ही पक्षांना प्रत्येकी ६ जागांवर विजय मिळाल्याने सत्ता कोणाची, अशी स्थिती आहे. सावलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे पूर्वी ५ जागा होत्या. यावेळी येथे भोपळाही फोडता आला नाही. भाजपने पोंभुर्णा नगरपंचायतीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, येथे काँग्रेसने १ जागा जिकंली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चार जागा गमावल्या आहेत.
पक्षीय बलाबल
१. सिंदेवाही : काँग्रेस -१३, भाजप ३, अपक्ष १
२. सावली : काँग्रेस -१४, भाजप -३
३. पोंभुर्णा : भाजप -१०, शिवसेना ४, वंचित २, काँग्रेस १
४. गोंडपिपरी : काँग्रेस ७, भाजप ४ शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस २, अपक्ष २
५. कोरपना : काँग्रेस १२, भाजप ४, शेतकरी संघटना १
६. जिवती : काँग्रेस ६, राष्ट्रवादी काँग्रेस ६, गोंगपा ५