नागपंचमीला नागाचे चक्क स्वयंपाकघरात ठाण !
By Admin | Updated: August 9, 2016 00:43 IST2016-08-09T00:43:26+5:302016-08-09T00:43:26+5:30
नागपंचमीच्या दिवशी एका नागाने चक्क स्वयंपाक घरात ठाण मांडले. काहींच्या मते हा एक योगायोग असला तरी...

नागपंचमीला नागाचे चक्क स्वयंपाकघरात ठाण !
नागभीड : नागपंचमीच्या दिवशी एका नागाने चक्क स्वयंपाक घरात ठाण मांडले. काहींच्या मते हा एक योगायोग असला तरी या दृश्याने घरच्यांची चांगलीच भबेरी उडाली, मात्र एका सर्पमित्राने हा नाग ताब्यात घेऊन दिलासा दिला.
त्यांचे झाले असे की, येथील चवडेखरी वार्डात धिरज कासेवार यांचे घर आहे. नागपंचमीच्या दिवशी कासेवार कुटुंबिय दिवसभर घरीच होते. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास धिरज यांच्या आई स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकगृहात गेल्या असता स्वयंपाकगृहाच्या ओट्यावर एक नाग चक्क डोलत असताना दिसून आला.
हे दृश्य बघून धिरज यांच्या आईचा काळजाचा ठोकाच चुकला. पण सावरुन त्यांनी घरातील लोकांना याची माहिती दिली. प्रसंगावधान राखून त्यांनी येथील एक सर्पमित्र पवन नागरे यांना ही माहिती दिली. पण पवन काही कामाच्या निमित्ताने बाहेर असल्याने त्यांनी येथील दुसरे एक सर्पमित्र समीर भोयर यांना या प्रकाराची कल्पना दिली.
समीरने क्षणाचाही विलंब न लावता साप पकडण्याचे साहित्य सोबत घेतले आणि तो तडक कासेवार यांच्या घरी गेला. परिस्थितीचे अवलोकन केले. आणि त्या नागास ताब्यात घेतले. सर्पमित्र समीर भोयर यांनी जेव्हा तो नाग ताब्यात घेतला, मात्र नागपंचमीच्या दिवशीच या नागाने चक्क स्वयंपाक घरात दर्शन दिल्याने याची गावात चांगलीच चर्चा होती. (तालुका प्रतिनिधी)