मूलमधील मटन मार्केट सीओंनी हटविले
By Admin | Updated: February 27, 2015 00:54 IST2015-02-27T00:52:38+5:302015-02-27T00:54:49+5:30
नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर वॉर्डातील मटन व चिकन मार्केटचा येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

मूलमधील मटन मार्केट सीओंनी हटविले
लोकमतचा प्रभाव
मूल : नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर वॉर्डातील मटन व चिकन मार्केटचा येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मटन मार्केटच्या दुर्गंधीमुळे नागरिक विविध आजारानी त्रस्त होते. याबात ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित करताच नव्याने आलेले मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांनी याकडे लक्ष देऊन मटन व चिकन मार्केट हटवून विक्रेत्यांना इतरत्र बसण्याची सुविधा करून दिली आहे. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येथील त्रस्त नागरिकांनी मटन मार्केट समस्येबाबत नगरपरिषद प्रशासनाच्या वेळोवेळी निर्देशनास आणून दिले. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात होते. आठवड बाजार ज्या ठिकाणी भरतो, त्याच परिसराच्या कडेला मटन व चिकन मार्केट थाटण्यात आले होते. बकऱ्याची व कोंबड्याची कत्तल केल्यानंतर अनावश्यक मांस त्याच ठिकाणी टाकले जात होते. त्यामुळे दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे वॉर्डातील लिना बद्देलवार व मिलींद खोब्रागडे यांनी ही बाब वेळोवेळी न.प. प्रशासनाच्या लक्षात आणून दिली.
याच परिसरात डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने स्वाईन फ्लूची धास्ती देखील नागरिकांत बळावली होती. १७ फेब्रुवारीला ‘लोकमत’ ने ‘महाविशरात्रीच्या पर्वावर स्वाईन फ्लूची धास्ती’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यामुळे न.प. प्रशासन खळबळून जागे झाले आणि सात दिवसानंतर मटन-चिकन मार्केट हटविण्याची कारवाई मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांनी रितसर नोटीस बजावून केली.
मुख्याधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने चिकन व मटन मार्केट मधील दुकानदारांनी आपले दुकान कत्तलखाना परिसरात लावले आहेत. आठवडी बाजाराला जागा कमी पडत असल्यास काही वर्षांपूर्वी अर्धवट गाळे बांधले आहेत, त्यांना पाडून त्या ठिकाणी बाजारासाठी ओठे निर्माण करण्यात यावे, अशी मागणी बाजार विक्रेत्यांनी केली आहे. आठवडी बाजार परिसरात पालिकेने संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे आठवडी बाजाराचा परिसर सुव्यवस्थित व येणाऱ्यांना सोयीचे होईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. (तालुका प्रतिनिधी)