डांबरी रस्त्यावर मुरुमाचे ढिगळ
By Admin | Updated: July 29, 2015 00:48 IST2015-07-29T00:48:10+5:302015-07-29T00:48:10+5:30
शहरातून गडचिरोलीकडे जाणाऱ्या व मुख्य रहदारी असलेल्या डांबरीकरी रस्त्यावर खड्डे पडले आहे.

डांबरी रस्त्यावर मुरुमाचे ढिगळ
चिखल पसरण्याची भीती : सार्वजनिक बांधकाम खात्याचा नवा फंडा
ब्रह्मपुरी : शहरातून गडचिरोलीकडे जाणाऱ्या व मुख्य रहदारी असलेल्या डांबरीकरी रस्त्यावर खड्डे पडले आहे. हे खड्डे डांबरीकरणाने बुजविणे क्रमप्राप्त असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चक्क मुरूम टाकून खड्डे बुजविले जात आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास चिखल पसरण्याची भीती असून सायकल चालक व पादचाऱ्यांना या मार्गावरुन जाणे- येणे कसरतीचे झाले आहे.
ख्रिस्तानंद चौक ते रेल्वे क्रॉसिंग आरमोरी रोडपर्यंत मोठमोठे खड्डे पडले होते, हे खड्डे बुजविण्यात आले. मात्र सहा महिन्याच्या कालावधी होत नाही आणि पाऊस झाल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डागडूजी करताना नेमका मटेरीअल कोणत्या स्वरुपाचा वापरला जात असते याची शहानिशा होत नाही. ज्या कंत्राटदाराला हे काम दिले जाते तो दुधावरच्या साईप्रमाणे गोंजारत काम करताना देखील दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हे खड्डे वारंवार जागे होत असतात. आता तर या खड्डयांवर चक्क मुरुम टाकले जात असल्याने काळा व लाल डांबररोड पहिल्यांदा पहावयास मिळतो आहे.
या मुरुमावर थोडा पाऊस झाला की, चिखल होऊन कोणाचा पेहराव लाल करेल हे सांगता येत नाही. पायी चालणारे, दुचाकी वाहनधारक यांची तर मोठी गोची होत आहे. महिला वर्गाना तर हे अधिकच धोक्याचे ठरत आहे. तरी संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेऊन डांबरी रस्त्यावरील खड्डे डांबरानेच बुजवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याची बांधकाम विभागाने तत्काळ दखल घ्यावी. (तालुका प्रतिनिधी)