वादातून भावाची हत्या; भाऊ व वहिनीला शिक्षा
By Admin | Updated: May 20, 2015 01:48 IST2015-05-20T01:48:13+5:302015-05-20T01:48:13+5:30
पाण्याचे टाके हलविण्यावरुन वाद झाला. या वादात सख्ख्या भावानेच भावास जबर मारहाण केली.

वादातून भावाची हत्या; भाऊ व वहिनीला शिक्षा
वरोरा : पाण्याचे टाके हलविण्यावरुन वाद झाला. या वादात सख्ख्या भावानेच भावास जबर मारहाण केली. यात तो जागीच मृत पावला. दिराला मारताना वहिनीने मदत केल्याने भाऊ व वहिनीस वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळका गावात संजय गौरकार व त्याचा भाऊ दीपक गौरकार शेजारी राहत होते. दोघा भावांमध्ये नेहमी भांडणे होत होती. १२ डिसेंबर २०१२ रोजी दोघा भावांमध्ये अंगणातील पाण्याचे टाके हटविण्यावरुन वाद झाला. यामध्ये संजयने दीपकला मारहाण करीत असताना संजयची पत्नी प्रतिभा हिने घरातून सुरा आणून आपला पती संजय याच्या हातात दिला. संजयने दीपकच्या डोळ्यात तिखट टाकून सुऱ्याने वार केले. दीपक पळत सुटल्यावर त्याचा पाठलाग करून संजयने पाडले व त्याच्यावर सुऱ्याने तसेच लाकडी काठीने डोक्यावर जबर मारहाण केल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला. मृत दीपकच्या पत्नीने वरोरा पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरुन मृत दीपकचा भाऊ संजय व त्याची पत्नी प्रतिभा याच्यावर कलम ३०२, ३४ भादंविने गुन्हा नोंदवून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील जयंत ठाकरे यांनी १२ साक्षदारांच्या साक्ष नोंदविल्या. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काझी यांनी सदर आरोपींना शिक्षा ठोठावली. (तालुका प्रतिनिधी)