मनपा अधिकारी व व्यावसायिकात खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:39 IST2018-07-26T23:38:33+5:302018-07-26T23:39:21+5:30
चंद्रपुरात सध्या प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू आहे. गुरुवारी मनपाचे पथक प्रियदर्शिनी चौक व वरोरा नाका चौकात कारवाईसाठी गेले. यावेळी अतिक्रमणही हटविण्याचा प्रयत्न झाला.

मनपा अधिकारी व व्यावसायिकात खडाजंगी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरात सध्या प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू आहे. गुरुवारी मनपाचे पथक प्रियदर्शिनी चौक व वरोरा नाका चौकात कारवाईसाठी गेले. यावेळी अतिक्रमणही हटविण्याचा प्रयत्न झाला. मात्र दंडाच्या रकमेवरून व्यावसायिक व मनपा अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
मनपाच्या या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या एका जणांविरुध्द झोन अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अतिक्रमण विभागाचे पथक गुरुवारी प्रियदर्शिनी चौकात गेले. त्या ठिकाणी व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून आले. यावेळी महिला झोन अधिकारी वाकडे यांनी दुकानदारांकडून दंड मागितला. मात्र यावेळी स्वत:ला हॉकर्स असोसिएशनचा अध्यक्ष म्हणवून घेणारा एक व्यक्ती तिथे आला आणि त्याने वाद निर्माण केला, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक नामदेव राऊत यांनी दिली. नंतर व्यावसायिकांनी तासभर अधिकाऱ्यांचे वाहन अडवून धरले.