नगरपरिषद झाली; आता अतिक्रमण हटवावे
By Admin | Updated: April 24, 2016 01:06 IST2016-04-24T01:06:58+5:302016-04-24T01:06:58+5:30
एखाद्या बाबतीत जमेची बाजू झाली की, लोकांच्या अपेक्षांना सुरुवात होते. नागभीडबाबत नेमके हेच होत आहे.

नगरपरिषद झाली; आता अतिक्रमण हटवावे
मार्गक्रमण करताना नाहक त्रास : अतिक्रमणामुळे रस्ते झाले अरुंद
नागभीड : एखाद्या बाबतीत जमेची बाजू झाली की, लोकांच्या अपेक्षांना सुरुवात होते. नागभीडबाबत नेमके हेच होत आहे. नागभीड नगर परिषद घोषित झाल्यापासून या नगर परिषदेकडून नागभीडकरांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. या अपेक्षेपैकी पहिली अपेक्षा येथे रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण केव्हा दूर करण्यात येते, ही आहे. त्यामुळे आता नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे.
आतापर्यंत नागभीडमध्ये ग्रामपंचायत कार्यरत होती. ग्रामपंचायत चालविणारे पदाधिकारी हे छोट्या छोट्या वॉर्डामधून निवडून येत असल्याने त्यांच्या काही मर्यादा होत्या. रोज तोंडावर तोंड पडते किंवा कशाला वैर विकत घ्यायचे म्हणून हे पदाधिकारी या समस्येकडे कानाडोळा करीत आले. परिणाम असा झाला की हे अतिक्रमण वाढत गेले. अतिक्रमण एवढे वाढले की काही काही ठिकाणी दोन दुचाकी वाहने एकमेकांसमोर आली तर मार्गक्रमण करण्यासाठी थोडा विचारच करावा लागतो.
खरे तर नागभीड हे तालुक्याचे ठिकाण आहे. विविध कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. तालुक्यातून दररोज हजारो नागरिक विविध कामासाठी नागभीडला येत असतात व आल्यानिमित्ताने विविध प्रकारची खरेदीही करीत असतात. पण या हजारो आणि गावातील नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता येथील रस्त्यांमध्ये राहिली आहे का, हा खरा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
सदर प्रतिनिधीने नागभीडमध्ये एक दिवस मुद्दाम फेरफटका मारला. यावेळी दिसलेली स्थिती अतिशय विदारक आहे. येथील जनता शाळेपासून टॉकीज चौकापर्यंत असलेला रस्ता ठिक आहे. पण टॉकीज चौकापासून तर भगतसिंग चौकापर्यंत नेहमीच वर्दळ राहत असलेला रस्ता अतिक्रमणाने पार गिळून टाकला आहे. या रस्त्यावर असलेल्या विविध प्रतिष्ठानांच्या मालकांनी त्यांच्या दुकानांसमोर असलेल्या नाल्यांवर छत टाकून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाने नाल्या कोठे गायब झाल्या हेच कळत नाही. त्यातच सामान खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने चारचाकी वाहनांना मार्गक्रमण करण्यासाठी जागाच उरत नाही.
भरीस भर याच रस्त्याने शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांनी मालवाहू वाहने जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते. अशावेळी मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. विठ्ठल मंदिराकडून बाजार चौकात जाणाऱ्या रस्त्याचीही स्थिती याहून वेगळी नाही.