भाविकांच्या पायाखाली महापालिकेचे निखारे
By Admin | Updated: March 30, 2015 00:41 IST2015-03-30T00:41:21+5:302015-03-30T00:41:21+5:30
चैत्राची सुरूवात झाली की, महाकाली मातेच्या भक्तांची हजारो पावलं चंद्रपुरच्या दिशेने निघतात.

भाविकांच्या पायाखाली महापालिकेचे निखारे
रूपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)
चैत्राची सुरूवात झाली की, महाकाली मातेच्या भक्तांची हजारो पावलं चंद्रपुरच्या दिशेने निघतात. निरामय भक्तीची ओढच त्यांना ईथवर घेऊन येते. कुणी वाहनाने, तर कुणी दूरवरून पायदळ चालत येऊन मातेच्या चरणी श्रद्धेनं आपला माथा टेकतात. पण तोवर त्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. चंद्रपुरातील खडतर वाटांवरून चालताना भाविकांना अक्षरश: रक्तबंंबाळ व्हावे लागत आहे.
दरवर्षी येथे भरणाऱ्या यात्रेसाठी शेकडो मैलांचा प्रवास करून हजारो भाविक येथे येतात. यंदाच्या गुढीपाडव्यापासून माता महाकाली यात्रेला प्रारंभ झाला. भाविकांचे जत्थेच्या जत्थे माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपुरात दाखल होत आहेत. सध्या चंद्रपुरातील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. महाकाली मंदिराकडून बैलबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महानगरपालिकेने हाती घेतले. परंतु गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे काम अर्ध्यावरच थांबविले आहे. विशेष म्हणजे यात्रेसाठी येणारे भाविक याच रस्त्याने पुढे जाऊन बैलबाजार परिसरात आपला ठिय्या देतात. मात्र या रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. ती तुडवतच भाविकांना पुढे जावे लागत आहे. माता महाकालीच्या भक्तीने भारावलेला भक्त अनवाणी असतो. त्यामुळे या रस्त्यावरून चालताना भाविकांना वेदना सहन करीत पुढे जावे लागत आहे. त्यात अनेकांचे पाय जखमी होऊन रक्ताळत आहेत. लहान-लहान मुलेही ठेचकाळून जखमी होत आहेत. या मार्गावर पसरलेली गिट्टी बाजुला करावी, अशी मागणी आहे.