मनपातर्फे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST2021-03-23T04:30:34+5:302021-03-23T04:30:34+5:30

चंद्रपूर : शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यास चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी नागपूर रोड ...

Municipal Corporation initiates action on unauthorized hoardings | मनपातर्फे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू

मनपातर्फे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू

चंद्रपूर : शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यास चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी नागपूर रोड चांदा क्लब समोरील एक मोठे होर्डिंग काढण्यात आले. या होर्डिंगधारकास दंड ठोठावण्यात आला आहे.

शहरात अनेक होर्डिंग, बॅनर हे अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून, याकरिता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही. अशा होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी मनपाने कंबर कसली असून शहरातील अनधिकृत होर्डिंगधारकांनी स्वतःहून काढून घ्याव्या, अन्यथा कारवाईस सामोरे जावे, असे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

महानगरपालिका हद्दीत अशा स्वरूपाचे डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर उभारताना मनपाकडून परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते; मात्र यातील अनेकांनी टॅक्ससुद्धा भरलेला नाही. बऱ्याच ठिकाणी मनपाकडून परवानगीही घेण्यात आलेली नाही. अशा अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतच आहे. शिवाय मनपाचे आर्थिक नुकसानही होत आहे. काही ठिकाणी धोकादायक इमारतींवर होर्डिंग्ज आहेत. होर्डिंग्ज काढण्याची कारवाई आता मनपातर्फे नियमित करण्यात येणार आहे.

बाॅक्स

कारवाईचा केव‌‌ळ फार्स

शहरातील प्रत्येक चौकात, एवढेच नाही तर महापालिका कार्यालय परिसरातही मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंग लावण्यात आली आहे. मात्र, महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शहरातील पथदिवे, इलेक्ट्रिक खांब, एवढेच नाही तर परकोटावरही होर्डिंग लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मोठमोठ्या वृक्षांवर खिळे लावून यावरही लावण्यात आले आहेत. याकडे महापालिका प्रशासनाने अद्यापपर्यंत लक्षच गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ एक-दोन होर्डिंग काढून मनपा कारवाईचा आव आणत असल्याचा आरोप सामान्य नागरिक करीत आहेत.

Web Title: Municipal Corporation initiates action on unauthorized hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.