शासनाच्या कामगार विरोधी धोरणाबाबत मुंडण आंदोलन
By Admin | Updated: August 15, 2016 00:35 IST2016-08-15T00:35:35+5:302016-08-15T00:35:35+5:30
राज्यशासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेर्धात प्रहार कामगार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी...

शासनाच्या कामगार विरोधी धोरणाबाबत मुंडण आंदोलन
अॅड हर्षल चिपळूणकरसह ६० जणांचे मुंडण : २२ कामगार संघटनेचे समर्थन
चंद्रपूर : राज्यशासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेर्धात प्रहार कामगार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी नागपूर येथे धरणे आंदोलन तथा मुंडण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्रातील २२ कामगार संघटनेने पाठिंबा दिला. सदर आंदोलनाची सुरुवात दुपारी १२ वाजतापासून झाली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अॅड हर्षल चिपळूणकर व कामगार नेते सी. आर.टेंभरे याच्यासह ६० जणांनी मुंडन करुन शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी अनेक कामगारांची उपस्थिती होती.
विदर्भ प्रहार कामगार संघटना व राष्ट्रवादी जनरल कामगार संघ यांनी १५ जुलैपासून कामगार विभागावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे क्रांतीदिनाच्या पर्वावर राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी विविध तक्रारी मांडण्यात आल्या. यामध्ये किमान वेतन अधिनियमाच्या भंगाबाबत तक्रारी करुनही तपासणी करण्यास हेतुपूर्वक टाळाटाळ करणे, माथाळी व सुरक्षारक्षक मंडळातील नोंदीत कामगाराचे वेतन जाणीवपूर्वक सहा महिन्यापर्यंत उशिरा देणे, वातावरण निर्मिती करुन नोंदीत कामगारांना राजीनामा देण्यास भाग पाडणे, सुरक्षा रक्षक चंद्रपूरची स्थापना २००९ मध्ये झालेली असून २०१५ अखेरपर्यंत कामगारांना योजनेपासून वंचीत ठेवणे, नोंदीत माथाडी कामगारांच्या वेतन व कायदेशीर देणीमध्ये अवैद्यरित्या अफरातफर करणे, राज्य शासनाच्या २४ फेंब्रुवारी २०१५ च्या अधिसुचनेनुसार सर्वच स्थानिक संस्थाच्या कर्मचाऱ्यांना वेतन दर नियमाप्रमाणे देण्यात येत नाही. कार्यकर्त्यांना न्यान न देता जनतेवर अन्याय करणे, या सर्व बाबींच्या विरोधात शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात धरणे व मुंडण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्रातील २२ कामगार संघटनेने पाठिंबा दर्शविला. यावेळी अनेक महिला व पुरुष कामगार तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)