राष्ट्राच्या परमवैभवासाठी मुकुंदराव पणशीकरांनी संघसाधना केली
By Admin | Updated: December 25, 2016 01:13 IST2016-12-25T01:13:05+5:302016-12-25T01:13:05+5:30
राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी साधना म्हणजे संघसाधना होय. राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्याच्या

राष्ट्राच्या परमवैभवासाठी मुकुंदराव पणशीकरांनी संघसाधना केली
रमेश पतंगे : मुकुंदराव पणशीकर स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळा
चंद्रपूर : राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी साधना म्हणजे संघसाधना होय. राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्याच्या संघसाधनेचे मुकुंदराव हे एक महान साधक होते, असे प्रतिपादन मुंबई येथील रमेश पतंगे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मुकुंदराव पणशीकर यांच्यावरील स्मृतिग्रंथाचा प्रकाशन सोहळा जनता महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पतंगे बोलत होते. मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक जयंतराव खरवडे व धर्मजागरण विभागाचे क्षेत्र संयोजक श्यामजी हरकरे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संघसाधक मुकुंदराव पणशीकर यांच्यावरील स्मृतिग्रंथासोबतच ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकर व राष्ट्रउभारणी’, या ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात आले.
पतंगे पुढे म्हणाले की, दुर्दम्य आत्मविश्वास, समत्वाचा मननोभाव, कार्याचा सातत्याने विचार या सर्वांचा आदर्श म्हणजे मुकुंदराव पणशीकर ते उत्तम वक्ते नसले तरी, आपले विचार सुस्पष्ट व ठामपणे मांडत होते. धर्मजागरण, सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषदेचे काम, शबरी कुंभाचे आयोजन, विद्यार्थ्यांचे वसतिगृह महाराष्ट्राच विविध शहरात उभारुन त्यांची व्यवस्था बघणे आदी विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
पुणे येथील भारतीय विचार साधना संस्थेला त्यांनी उर्जितावस्था प्राप्त करून दिली. तसेच डबघाईला आलेल्या जनता सहकारी बँकेला तारुन तिचे भाग भांडवल कसे वाढेल, याची रचना त्यांनी आखून दिली, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जयंतराव खरवडे यांनी म्हणाले की, संसार सांभाळून संघाचे कार्य करणे व संपूर्ण वेळ संघ कार्यासाठी देणे, अशा संघाच्या कार्य शैलीच्या दोन व्यवस्था आहे. यात संपूर्ण वेळ संघ कार्यासाठी देणाऱ्यांमध्ये मुकुंदराव अग्रणी आहे. शामजी हरकरे यांनी मुकुंदरावांसमवेत कार्य केल्याची आठवण जागी केली.
प्रस्ताविक व आभार प्रदर्शन संजय दाणेकर यांनी आणि संचालन समिधा दाणेकर यांनी केले. (प्रतिनिधी)