महावितरणच्या नोटीसने वीजग्राहक हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:05+5:302021-02-05T07:38:05+5:30

गोंडपिपरी : कोरोना या महामारीमुळे अनेक राष्ट्रांसह देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे अनेकांच्या हातून रोजगार हिरावल्याने उपासमारीचे ...

MSEDCL's notice shocked the consumers | महावितरणच्या नोटीसने वीजग्राहक हादरले

महावितरणच्या नोटीसने वीजग्राहक हादरले

गोंडपिपरी : कोरोना या महामारीमुळे अनेक राष्ट्रांसह देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे अनेकांच्या हातून रोजगार हिरावल्याने उपासमारीचे संकट ओढवले होते. अशातच हवामानाचा दगा व निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती उत्पादनात घट झाली. अशा हलाखीच्या परिस्थितीत कसबसे जीवन जगणाऱ्या ग्रामीण जनतेला आता महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्यासंबंधीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे वीज ग्राहक चांगलेच हादरले आहेत.

ग्रामीण वीजग्राहकांसमोर प्रचंड आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार बुडाले. शहरी भागासह ग्रामीण भागातही करण्यात आलेल्या ऐतिहासिक टाळेबंदीचे दुष्परिणाम हे सर्वसामान्यांवरही तेवढेच जाणवत होते. अशा बिकट परिस्थितीत खचून न जाता खेड्यांमधील जनतेने लघु व्यवसायासह परंपरागत शेती व्यवसायाला जोडधंदे करून हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कंबर कसली. मात्र निसर्गाने साथ न दिल्यामुळे तालुक्यातील शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी तथा इतर व्यावसायिकांच्या शेती उत्पादनात घट होऊन प्रचंड नुकसान झाले. असा आर्थिक तणाव सुरू असतानाच आता लॉकडाऊन काळातील थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, यासंदर्भात वीज ग्राहकांना महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा दम देत नोटीस बजावल्याने वीज ग्राहकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नोटीसीत नमूद सूचनेनुसार नोटीस बजावल्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या कालावधीत वीज बिलाचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच वीज पुरवठा कापल्यानंतर पुन्हा वीज जोडणी मागणाऱ्या ग्राहकास अतिरिक्त वीज जोडणी भार आकारण्यात येईल, असे स्पष्ट बजावल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. महावितरण कंपनीने वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील वीज ग्राहकांनी केली आहे.

Web Title: MSEDCL's notice shocked the consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.