शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: September 4, 2016 00:49 IST2016-09-04T00:49:04+5:302016-09-04T00:49:04+5:30
स्थानिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीदरम्यान प्राध्यापकाने...

शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
गुन्हा दाखल : प्राध्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण
चंद्रपूर : स्थानिक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीदरम्यान प्राध्यापकाने एका विद्यार्थ्याला शुक्रवारी बेदम मारहाण केली. त्यावरून महाविद्यालयात तणाव निर्माण झाला होता. त्या विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर रामनगर पोलीस ठाण्यात प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारी धरणे देऊन निदर्शने केली. पोलीस शुक्रवारी उशिरा रात्री प्रा. पेचे यांचा शोध घेण्यासाठी गेले असता ते सापडले नाही.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी निवडणूक होती. त्यामध्ये बी.ई. (इलेक्ट्रिकल) अतिंम वर्षांचा विद्यार्थी महेंद्र वावरकर याने उमेदवारी दाखल केली होती. निवडणूक असल्याने तो महाविद्यालयाच्या पटांगणातील मतदानकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा होता. त्यावेळी प्रा. राजेश पेचे यांना कुणी तरी वावरकर रस्त्यावर उभा राहून प्रचार करीत असल्याची माहिती दिली. त्यावरून चिडून प्रा. पेचे यांनी महेंद्र वावरकर याला पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा विरोध करीत वावरकर याने शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्रा. पेचे यांच्याविरोधात धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
पेचे दीर्घ रजेवर
प्रा. राजेश पेचे यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे प्रकरण पोलिसांत पोहोचल्यानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य धीरज कपूर यांनी त्यांना दीर्घ रजेवर पाठविले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य रजेवर असल्याने प्रा. कपूर यांच्याकडे पदभार आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना निवेदन सादर करण्यास सांंगितले. परंतु विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनावर विश्वास राहिला नसल्याचे स्पष्ट करून निवेदन देण्यास नकार दिला.
यापूर्वीही अनेकांना मारहाण
प्रा. राजेश पेचे यांनी यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याची तक्रार करण्यात आल्यानंतरही महाविद्यालय प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी प्रा. पेचे यांना निलंबित केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.