पंचायत समितीस्तरावर सभापतीपदासाठी हालचाली
By Admin | Updated: September 2, 2014 23:38 IST2014-09-02T23:38:53+5:302014-09-02T23:38:53+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील १५ पंचायत समितीमधील कार्यरत सभापती व उपसभापतीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार

पंचायत समितीस्तरावर सभापतीपदासाठी हालचाली
बल्लारपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील १५ पंचायत समितीमधील कार्यरत सभापती व उपसभापतीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सभापती व उपसभापतीपदाची निवड करण्यासाठी १४ सप्टेंबरला निवडणूक होऊ घातली आहे. यामुळे पंचायत समितीस्तरावर सभापतीपदासाठी हालचालींना चांगलाच वेग घेतला आहे.
मागीलवेळी अडीच वर्षासाठी सभापती व उपसभापतीपदाची निवड १४ मार्च २०१२ रोजी करण्यात आली होती. त्याचा कार्यकाळ १४ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम घोषित होताच, ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघत आहे. राजकीय पक्षांनी आपल्याच पक्षाचे सभापती व उपसभापती विराजमान करण्यासाठी तडजोडीचा मार्ग अवलंबविण्यास सुरुवात केली आहे. एकूण १५ पंचायत समिती असून तब्बल आठ पंचायत समितीमध्ये महिला सभापती होण्याचा मान मिळणार आहे.
जिल्ह्यातील चिमूर (अनुसूचित जाती), गोंडपिंपरी व राजुरा (अनुसूचित जमाती), वरोरा व बल्लारपूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग), भद्रावती, नागभीड व सिंदेवाही सर्वसाधारण वर्ग या आठ पंचायत समित्यांवर महिलांना सभापतीपदाची संधी मिळण्याचा मार्ग आरक्षणामुळे मोकळा झाला आहे. ब्रह्मपुरी येथे अनुसूचित जाती, मूल अनुसूचित जमाती, जिवती व पोंभूर्णा नागरिकांचा मागास प्रवर्ग, चंद्रपूर, सावली व कोरपना येथे सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण असे आहे. या सात पंचायत समितीमध्ये पुरुष मंडळी सभापती पद बळकावण्यासाठी मोर्चेबांधणीला लागले आहेत.
चंद्रपूर पंचायत समितीमध्ये १२, भद्रावती ८, चिमूर १२, वरोरा ८, ब्रह्मपुरी ८, नागभीड १०, सिंदेवाही ८, मूल ६, सावली ८, पोंभूर्णा ४, गोंडपिंपरी ६, राजुरा ८, कोरपना ८, जिवती व बल्लारपूर ४ पंचायत समिती मध्ये पंचायत समितीचे सदस्य आहेत. आजघडीला काँग्रेसचे सभापती बल्लारपूर, कोरपना, गोंडपिंपरी, सिंदेवाही, नागभीड व वरोरा या सहा पंचायत समित्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, मूल, पोंभूर्णा व जिवती पंचायत समितीवर भाजपाचे सभापती आहेत. मनसकडे भद्रावती, युवाशक्ती संघटनेकडे चिमूर, राष्ट्रवादीकडे सावली व शेतकरी संंघटनेकडे राजुरा पंचायत समितीचे सभापती आहेत.
आगामी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाकडे राहतील. याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले आहेत.(शहर प्रतिनिधी)